नृसिंहवाडी, पुढारी वृत्तसेवा : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेला पाऊस व काही धरणातील वाढता विसर्ग यामुळे कृष्णा, पंचगंगा नद्यांची पातळी दोन दिवसांत दहा ते बारा फुटाने वाढली आहे. त्यामुळे श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिराला पुन्हा एकदा पाण्याचा विळखा पडला आहे.
दरम्यान, आज (दि.२६) दुपारी तीन वाजता श्रींच्या मुख्य चरणावर पाणी आल्यामुळे यंदा तिसऱ्यांदा दक्षिणद्वार सोहळा झाला. श्रावण महिन्यातील सोमवार, गोकुळ अष्टमी असल्यामुळे या दुहेरी सोहळ्यातील पर्वणीचा लाभ शेकडो भाविकांनी मंदिर परिसरातील दक्षिण द्वारात स्नान करून घेतला. त्यामुळे आज सायंकाळी परत पूज्य नारायण स्वामी मंदिरात देव आले. श्रींच्या उत्सव मूर्तीवर दत्त देवस्थानामार्फत होणारे नित्य कार्यक्रम सुरू झाले आहेत. रात्री धुपारती कृष्णा नदीची पूजा सेवेकरी मंडळींकडून मंत्रपठणासह करण्यात आली. (Nrusinhwadi Shri Datt Temple)
कोकणात पडणाऱ्या पावसामुळे पंचगंगे बरोबर कृष्णा नदीच्या पाण्यातही लक्षणीय वाढ होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतीचा भाग हळूहळू पाण्यात जात आहे. देवस्थान समितीने नित्य पूजेचे साहित्य सुरक्षित ठिकाणी आणले असून उद्या मंगळवार पासून श्रींच्या उत्सव मूर्तीवर दुपारी साडेबारा वाजता महापूजा होणार आहे. श्रावण महिना असल्यामुळे दत्त दर्शनासाठी येथे गर्दी होताना दिसून येत आहे.