

डॅनियल काळे
कोल्हापूर : ‘मी पदवीधर आहे’, ‘मी आजारी आहे’, ‘मला झाडू काम जमत नाही...’ काम टाळणार्या महापालिका कर्मचार्यांनी अशी नानाविध कारणे पुढे केल्याने शहरात अस्वच्छता वाढत आहे. हातात झाडू घेऊन रस्त्यावर उन्हात काम न करता कार्यालयात सावलीत किंवा पंख्याखाली बसायचे काम प्रत्येक कर्मचार्याला हवे आहे. मूळ नेमणूक झाडू, सफाई किंवा पवडी कामगार म्हणून असतानाही अनेक कर्मचारी ही कामे टाळून सावलीतली, आरामदायी कामे शोधत आहेत. अधिकार्यांनी त्यांना मूळ कामावर पाठविण्याचा प्रयत्न केला, तर लगेच राजकीय दबाव, फोन, शिफारस पत्र आणि ‘वरून आलेला हुकूम’ सुरू होतो. परिणामी, महापालिकेत कामचुकार संस्कृतीला खतपाणी मिळत आहे.
महापालिकेत सुमारे चार हजार कर्मचारी आहेत. यापैकी दोन हजारांहून अधिक कामगार झाडू व सफाई विभागात आहेत; पण प्रत्यक्ष रस्त्यावर झाडू हाती घेणारे मोजकेच! रस्ते लोटणे, गटारी काढणे, कचरा प्रकल्पावर काम करणे, ड्रेनेज साफ करणे ही कामे करायची कोणी, असा प्रश्न आता प्रशासनाला पडला आहे. अनेक झाडू कामगार आता शिपाई, क्लार्क, किंवा ‘साहेबांच्या घरातील मदतनीस’ म्हणून कार्यरत आहेत. मूळ काम विसरून सावलीतील पदे त्यांनी गाठली आहेत.
महापालिकेतील वाढत्या कामचुकारपणामुळे स्वच्छ कोल्हापूरचे स्वप्न आता प्रशासनापुढे मोठे आव्हान बनले आहे. हातात झाडू घेऊन शहर लोटणारे कर्मचारी असले की, शहर स्वच्छ होते; पण सावलीत बसणार्यांमुळे कोल्हापुरात घाणीचे साम—ाज्य वाढत चालले आहे.
महापालिकेच्या प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी नुकताच आदेश जारी करून मूळ झाडू कामगारांना तत्काळ त्या ठिकाणी रुजू करावे, असे स्पष्ट निर्देश दिले; मात्र आदेशाला तीन ते चार दिवस उलटले, तरी निम्म्याहून अधिक कर्मचारी हजर झालेले नाहीत. कार्यालयीन खुर्ची सोडून झाडू उचलणे आता त्यांना परवडत नाही. काम टाळणार्या कर्मचार्यांच्या निष्क्रियतेमुळे शहरातील स्वच्छता उपक्रमांवर परिणाम झाला आहे. कचरा संकलन, रस्त्यांची स्वच्छता, ड्रेनेज साफसफाई अशा मूलभूत कामांमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत.
कोल्हापूर शहराचा विस्तार वेगाने होत असताना महापालिकेकडे अजूनही 1984 च्याच आकृतिबंधानुसार कर्मचारी संख्या आहे. अनेक कर्मचारी निवृत्त, काही मयत, तर काही काम करण्यास अक्षमआहेत. परिणामी, झाडू आणि सफाई विभागावर अतिरिक्त ताण वाढला आहे.