

कोल्हापूर : राजकारणात चढ-उतार येत असतात. मात्र, काँग्रेसला अजूनही मोठा जनाधार आहे. आपली लढाई आपणाला लढावी लागेल. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज आहे. प्रत्येक कार्यकर्त्याच्या मागे आपण खंबीरपणे उभे राहू. कार्यकर्त्यांनी नव्या उमेदीने कामाला लागावे, असे आवाहन विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ. सतेज पाटील यांनी केले.
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसने आपली यंत्रणा आता गतिमान करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस कमिटीमध्ये रविवारी पन्हाळा तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. महागाई, भ्रष्टाचारामुळे महायुती सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे आधार देण्याचे काम काँग्रेस पक्ष करेल, अशी आशा सर्वसामान्य जनतेला वाटत आहे. राज्यावर अतिवृष्टीचे संकट आल्यानंतरही मदतीची भावना तिन्ही पक्षांमध्ये दिसून येत नाही. महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये मतभेद असल्याचे दिसून येत आहे. भाजपला शिंदे शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी संपवायची आहे. राजकारणाची पातळी घसरत चालली आहे. एकमेकांचे बाप काढले जात आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेसला मोठा जनाधार मिळत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी नव्या उमेदीने कामाला लागावे, असे आ. पाटील यांनी सांगितले.
यावेळी पन्हाळा तालुकाध्यक्ष जयसिंग हिर्डेकर यांनी, कोण गेले याची चिंता न करता आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका काँग्रेस म्हणून ताकदीने लढूया, असे सांगितले. निवास पाटील यांचेही भाषण झाले. बैठकीस तालुका उपाध्यक्ष पा. वी. पाटील, सुनील पाटील, दिनकर पाटील, सागर भूमकर, रावसाहेब पाटील, बी. आर. पाटील, राजू म्हामुलकर, प्रकाश पाटील, अर्जुन पाटील आदी उपस्थित होते.