कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजासाठी सुरू केलेल्या ‘श्री प्रिन्स शिवाजी बोर्डिंग हाऊस’च्या कारभारात गेल्या काही वर्षांपासून सगळा सावळागोंधळ सुरू असल्याचे दिसत आहे. परिणामी, दिवसेंदिवस संस्थेची शैक्षणिक गुणवत्ता ढासळत चालली असून, संस्थेच्या आजपर्यंतच्या लौकिकास बट्टा लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
बहुजन समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी स्थापन झालेल्या या संस्थेचा कारभार गेल्या काही वर्षांपासून म्हणजेच संस्थेच्या कारभाराची सूत्रे के. जी. पाटील आणि त्यांच्या सहकार्यांच्या हाती गेल्यापासून इथला कारभार केवळ काही मूठभरांच्या उन्नतीसाठी सुरू आहे की काय, अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे या संस्थेच्या कारभाराविरुद्ध जाहीर तक्रारी सुरू झाल्या आहेत. संस्थेच्या कारभारासाठी संस्थेने रीतसर घटना तयार केली आहे; मात्र ही घटना खुंटीला टांगून सध्या केवळ काही प्रमुख पदाधिकार्यांच्या मनमानीनुसार कारभार सुरू आहे. त्याचा उत्तम नमुना म्हणजे गेल्या पाच वर्षांत संस्थेची वार्षिक सभाच झालेली नाही. संस्थेच्या पदाधिकार्यांची व कार्यकारिणी सदस्यांची रिक्त पदे भरण्याचे मुद्दामहून टाळले जात आहे, जेणेकरून काही मूठभर कारभार्यांना संस्थेत मनमानी करता येईल.
बहुजन समाजातील गोरगरीब मुलांच्या शिक्षणासह भोजनाचीही सोय होईल याद़ृष्टीने शाहू महाराजांनी बोर्डिंगमध्ये भोजनाचीही सोय केली होती; पण संस्थेच्या विद्यमान कारभार्यांनी दोन्ही वसतिगृहे बंद पाडून गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे बंद करण्याचे ‘पुण्यकर्म’ पार पाडलेले दिसत आहे. संस्थेचे जे विद्यमान कारभारी आहेत, त्यांना वसतिगृहाचे महत्त्व कळाले असते, तर ती बंदच पडली नसती; पण ‘आयत्या पिठावर रांगोळी’ची सवय लागलेल्या या मंडळींना त्याचे काहीही सोयरसूतक दिसत नाही.
संस्थेसाठी लागणार्या विविध साहित्याची खरेदी पूर्वी जाहीर निविदांद्वारे व्हायची; पण सध्या अशी खरेदी विनानिविदा करण्याची नवी पद्धत रूढ झालेली दिसत आहे. कारभार्यांच्या मर्जीतील काही मूठभर पुरवठादारांकडूनच खरेदी केली पाहिजे, असा अलिखित फतवाच कारभार्यांनी काढलेला आहे. संस्थेतील सेवकांना नियमानुसार वेतनवाढी दिल्या जात नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. शिवाय, मर्जीतील कर्मचार्यांना पोसण्यासाठी अनेक कर्मचार्यांची मुस्कटदाबी सुरू असल्याच्याही तक्रारी आहेत.
एकूणच या संस्थेच्या कारभारात गेल्या काही वर्षांमध्ये अनागोंदी माजलेली दिसत आहे. याचा फटका सरतेशेवटी विद्यार्थ्यांना बसू लागला आहे. त्यामुळे आता ही संस्था वाचविण्यासाठी जनआंदोलनाशिवाय पर्याय दिसत नाही.
के. जी. पाटील हे संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. संस्थेच्या खर्चाने स्वत:चा वाढदिवस साजरा करण्याची त्यांना सवयच जडली आहे, असा आरोप होत आहे. 15 सप्टेंबरला संस्थेत कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. 2022 साली न्यू कॉलेज ऑफ फार्मसीचे उद्घाटन, 2023 साली न्यू विमेन्स कॉलेजचे उद्घाटन, यंदा असाच काही तरी कार्यक्रम! निमित्त असते शैक्षणिक उपक्रमाचे; पण मुख्य सोहळा अध्यक्ष महोदयांच्या वाढदिवसाचा असतो. या कार्यक्रमाचा बोजा टाकायचा संस्थेवर, असा प्रकार तीन वर्षांपासून सुरू असल्याच्या तक्रारी आहेत.