मुंबई : शरद पवार यांच्याशी माझे वैर नाही; परंतु समरजित यांची आता खैर नाही, असा इशारा वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्यमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. येणारी विधानसभेची निवडणूक (Kolhapur Politics) म्हणजे नायक विरुद्ध खलनायक असल्याची टीकाही त्यांनी केली.
मुंबईमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांशी मुश्रीफ बोलत होते. कागलमध्ये समरजित घाटगे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार गटात झालेला प्रवेश आणि जाहीर सभा याबाबत पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले.
यापूर्वी कागलमध्ये झालेल्या तिरंगी लढतींमुळे तुमचा विजय सोपा होत होता. यावेळी समोरासमोर लढत आहे. या प्रश्नावर मुश्रीफ म्हणाले, आतापर्यंत आपण एकूण सहा विधानसभा निवडणुका लढलो. त्यापैकी एकास एक अशा लढती तीनवेळा झालेल्या आहेत. तिरंगी लढत एकवेळाच झाली आहे.
सदाशिवराव मंडलिक यांच्या चार निवडणुका आणि माझ्या प्रचारासाठी सहा निवडणुका असे एकूण दहाहून अधिक वेळा पवार गैबी चौकातील जाहीर सभेसाठी आलेले आहेत. या सर्व सभांमधून त्यांनी सांगितले आहे की, राजा विरुद्ध प्रजा या लढाईत नेहमी प्रजाच जिंकत असते. यावेळीही त्यांना तेच म्हणायचे आहे.
तुमच्या विरोधात समरजित घाटगे यांना राष्ट्रवादी पक्षामध्ये घेतले आहे. या प्रश्नावर बोलताना मुश्रीफ म्हणाले, त्यांना कशासाठी घेतले आहे, ते मला काही माहीत नाही. तुमच्या मागे कारवायांचा ससेमिरा लावला होता व तुमच्या कुटुंबाची फरफट झाली होती. या प्रश्नावर मुश्रीफ यांनी पत्रकारांनाच प्रतिप्रश्न केला की, तो ससेमिरा कोणी लावला होता? यावेळी प्रश्न विचारणार्या पत्रकारांपैकीच एकाने उत्तर दिले, समरजित घाटगे यांनी. हा संदर्भ घेत मुश्रीफ म्हणाले, त्यामुळेच ही निवडणूक म्हणजे नायक विरुद्ध खलनायक अशी लढत आहे.