कोल्हापूर : डिबेंचर रक्कम परत देण्याच्या मागणीसाठी दूध संस्थाचालक व उत्पादक गुरुवारी प्रचंड आक्रमक झाले. मोर्चाने आलेले आंदोलक पोलिसांचे कडे तोडून ताराबाई पार्कातील गोकुळ कार्यालयात थेट जनावरांसह घुसले. यावेळी पोलिस व दूध उत्पादक आणि संस्था चालक यांच्यात अक्षरश: धुमश्चक्री झाली. त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. यात एक जखमी झाला. दरम्यान, ‘जय श्रीराम’ आणि ‘डिबेंचरची रक्कम परत द्या’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
गोकुळने डिबेंचरसाठी 40 टक्के रक्कम कपात केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी दूध उत्पादक संस्थांच्या वतीने मोर्चाचे आयोजन केले होते. त्यामुळे गोकुळ कार्यालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलक मोर्चाने ताराबाई पार्क येथील गोकुळ कार्यालयासमोर येताच पोलिसांनी अडविले. यावेळी आंदोलकांनी आत सोडण्याची विनंती केली. पोलिसांनी नकार दिल्यानंतर आंदोलक पोलिसांचे कडे तोडून घुसण्याचा प्रयत्न करू लागले. परंतु पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांना अडविले.
राजेश नाईक प्रथम कठड्यावरून चढून आत आले. सुरक्षारक्षक व पोलिस बाहेर होते. नाईक यांनी गेट उघडण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना कर्मचाऱ्यांनी पकडून बाजूला नेले. त्यानंतर जयराज बारदेस्कर आत घुसले आणि गेटची कडी काढू लागले त्यांनाही अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु त्यांनी ताकदीच्या जोरावर गेट उघडले. गेट उघडताच आंदोलक घुसू लागले आणि पोलिस व आंदोलकांत जोरदार धुमश्चक्री सुरू झाली. त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. लाठीमाराला न जुमानता जनावरांसह आंदोलक आत जाण्यात यशस्वी ठरले.
शौमिका महाडिक आत आल्यानंतर त्यांनी बाहेर राहिलेल्या आंदोलकांनाही आत सोडण्याची विनंती केली. आम्ही मोडतोड करणार नाही, असे त्यांनी पोलिसांना आश्वासन दिले. त्यानंतर आणखी आंदोलकांना आत प्रवेश देण्यात आला. यानंतर शिष्टमंडाने गोकुळ संचालकांची भेट घेतली.
आंदोलकांनी सोबत आणलेल्या एका म्हशीला पोलिस कर्मचाऱ्याने लाथ मारण्याचा प्रयत्न केला. यावरून वातावरण चांगलेच चिघळले. काही आंदोलक पोलिसांच्या अंगावर धावून गेले. त्यावरून प्रचंड गोंधळ झाला. यामध्ये राजाराम कोगे किरकोळ जखमी झाले.