कोल्हापूर : ‘वाचवा रे वाचवा, गोकुळ वाचवा’, परत करा... परत करा... आमचे पैसे परत करा... अशा घोषणा देत हलगी, घुमक्याच्या वाद्यात डिबेंचर कपातीच्या निषेधार्थ गुरुवारी दूध उत्पादक व दूध संस्थाचालकांनी ताराबाई पार्क येथील गोकुळच्या कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चामध्ये दूध उत्पादक शेतकर्यांसह संस्था चालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
गोकुळने दूध उत्पादक संस्थांकडून डिबेंचरची चाळीस टक्के रक्कम कपात करून घेतल्यामुळे संस्थाचालकांमधून तीव— नाराजी व्यक्त होत होती. यासंदर्भात गोकुळ प्रशासनाला निवेदन देऊनही त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या आंदोलकांनी प्रथम गोकुळ शिरगाव येथे गोकुळ प्रकल्पस्थळी आंदोलन केले. त्यानंतरही या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल गुरुवारी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. मोर्चासाठी सकाळपासून आंदोलक सर्किट हाऊस येथे जमत होते.
गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांच्या हस्ते गायीचे पूजन करून मोर्चास सुरुवात करण्यात आली. यावेळी महाडिक यांनी आंदोलन शांततेत करण्याचे आवाहन केले. ‘चिली बिली... चिली बिली धुमडाका...’ या पारंपरिक घोषणेसह ‘गोकुळ आमच्या हक्काचं... डिबेंचरची रक्कम परत मिळालीच पाहिजे...’ अशा घोषणा देत धैर्यप्रसाद हॉल, शासकीय मुद्रणालयमार्गे गोकुळच्या कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. ‘डिबेंचरचे पैसे कुणाच्या खिशात’, नेत्यांची दिवाळी, दूध उत्पादकांचे दिवाळे’, ‘आमचे पैसे परत करा’ असे फलक हातामध्ये आंदोलकांनी धरले होते.
मोर्चा गोकुळसमोर आल्यानंतर आंदोलकांनी आणलेली जनावरे गेटला बांधण्याचा प्रयत्न केला. परंतु याला पोलिसांनी विरोध केला. यातूनच वादावादीला सुरुवात झाली. मोर्चात शौमिका महाडिक यांच्यासह माजी संचालक विश्वास जाधव, दीपक पाटील तसेच राजवर्धन नाईक-निंबाळकर, अॅड. माणिक शिंदे, तानाजी पाटील, जोतिराम घोडके, हंबीरराव पाटील, प्रताप पाटील-कावणेकर, प्रवीण पाटील आदी सहभागी झाले होते.