कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
महाविकास आघाडीला पश्चिम महाराष्ट्रात ५८ जागांपैकी ४५ पेक्षा अधिक जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त करून विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ. सतेज पाटील यांनी, मुख्यमंत्रिपदावरून अथवा जागावाटपावरून महाविकास आघाडीत कोणताही वाद नाही. जनतेला हवे असणारे शाश्वत सरकार देण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न राहील, असे माध्यमांशी बोलताना सांगितले.
महाविकास आघातील घटक पक्षांच्या नेत्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहेत. आतापर्यंत १५० ते १६० जागांवर एकमत झाले आहे.उर्वरित जागांवर ३० सप्टेंबर व १ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या बैठकीत तोडगा निघेल. राज्यात महाविकास आघाडी सर्वाधिक कोल्हापुरातच एकसंध दिसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
काँग्रेसच्या वतीने विधानसभा मतदारसंघनिहाय निरीक्षक नेमले असून त्यांच्याद्वारे स्वतंत्रपणे काम सुरू आहे. महायुतीच्या सरकारच्या काळात महागाई, बेरोजगारी वाढली आहे. शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही, अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्याला मिळाली नाही. त्यामुळे सामान्य जनतेला हे सरकार नको असल्याने शाश्वत सरकार देण्याची जबाबदारी महाविकास आघाडीची असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले.