कोल्हापूर : जिल्ह्यात मानवी वस्तीजवळ असलेला भूस्खलनाचा धोका कमी करण्यासाठी 13 गावांत सौम्यीकरणाच्या कामांचा पाठवलेला प्रस्ताव वर्ष होत आले, तरी धूळ खात पडला आहे. एखाद्या ठिकाणी दुर्दैवाने दरड कोसळली, दुर्घटना घडली तरच शासन जागे होणार का? असा सवाल आहे. जिल्ह्यातील 86 गावांना भूस्खलनाचा धोका आहे. दरड कोसळणे, भूस्खलन होणे या प्रकारांत जिल्ह्यात वाढ होत चालली आहे.
राज्यात गेल्या काही वर्षांत झालेल्या भूस्खलनाच्या घटनांमुळे भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जीएसआय) यांनी भूस्खलनाचा धोका असलेल्या गावांची यादी तयारी केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील 56 गावांची यादी राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला मे 2024 मध्ये पाठवली होती. यापैकी मानवी वस्तीशेजारी अधिक धोका असणार्या गावांतील भूस्खलन सौम्यीकरणाच्या कामांचे प्रस्ताव तातडीने सादर करा, अशा सूचनाही दिल्या होत्या. सार्वजनिक बांधकाम विभागाने असा धोका असणार्या 13 गावांचा 83 कोटी 15 लाख रुपयांचा प्रस्ताव तयार केला होता. जिल्हा प्रशासनाने हा प्रस्ताव ऑगस्ट 2024 मध्ये राज्य शासनाला सादर केला आहे. तेव्हापासून हा प्रस्ताव शासनदरबारी आहे.
जिल्ह्यात 2018 मध्ये 20 गावांत भूस्खलनाच्या घटना पडल्या होत्या. 2019 मध्ये हीच संख्या 42 वर गेली. 2021 मध्ये 86 गावांत भूस्खलनाच्या घटना घडल्या, यामध्ये कोल्हापूर-पन्हाळा, जोतिबा यासह गगनबावडा तालुक्यातही काही रस्ते भूस्खलनाने अनेक दिवस बंद राहिले होते. या भूस्खलनात 2018 मध्ये एक, 2019 मध्ये एक, तर 2021 मध्ये दोन जणांचे मृत्यूही झाले आहेत.
भुदरगड तालुक्यातील फये येथे रिटेनिंग, गॅबियन भिंत, गगनबावड्यात टेकवाडी येथे संरक्षण भिंत बांधणे, करवीर तालुक्यातील बोलोली आणि तेरसवाडी येथे रिटेनिंग भिंत, पन्हाळा तालुक्यातील बेतवडे येथे संरक्षक भिंत, ढिगारा काढणे, जोतिबा येथे उंच गॅबियन भिंत, पन्हाळा येथे खडक बोटिंग ते नैसर्गिक खडक निर्मिती, राधानगरी तालुक्यात पाट पन्हाळा, शिरगाव, केळोशी बुद्रुक, असंडोलीत रिटेनिंग किल्ला गरियन भिंत, शाहूवाडीत मुंगूर व मलकापुरात संरक्षक भिंत कामे होणार आहेत.
भूस्खलनाचा धोका असलेल्या जिल्ह्याच्या यादीत कोल्हापूर देशात 142 व्या क्रमांकावर आहे. ‘इस्रो’च्या वतीने केलेल्या सर्वेक्षणानंतर देशपातळीवरील क्रमवारी जाहीर केली होती. या यादीत कोल्हापूरचा समावेश आहे.
प्रवाहाला बाधा आली, तर पाणी मोठ्या प्रमाणात जमिनीत मुरते. हे प्रमाण वाढत जाऊन भूस्तराचे विभाजन होते आणि भूस्खलन होते. जुलै महिन्यात गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात पावसाचे प्रमाण वाढत आहे. यामुळे याच महिन्यात भूस्खलनाचा धोकाही अधिक आहे.
सौम्यीकरणाच्या प्रस्तावात भुदरगड तालुक्यातील फये गावाचाही समावेश आहे. या गावात धरणाशेजारीच काही अंतरावर गाव असून, जमिनीला भेगा पडणे, भूस्खलनाच्या घटना सतत होत असतात. यावर्षी काही दिवसांपूर्वीच जमिनीला भेगा पडल्या आहेत.