कुरुंदवाड पालिकेचे मुख्याधिकारी आणि महिला अधिकाऱ्यांच्यातील शहरातील जनतेविषयी आक्षेपहार्य संभाषणाची ध्वनीफिती व्हायरल झाल्याने शहरातील नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. ध्वनीफितीमधील संभाषणाचा निषेध करत नागरिकांनी पालिकेवर मोर्चा काढला. याप्रकरणी कारवाई करण्यासाठी सपोनी रविराज फडणीस यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मुख्याधिकारी आशिष चौहान यांना सक्तीच्या रजेवर पाठवत कुरुंदवाड पालिकेचा प्रभारी कार्यभार जयसिंगपूर पालिकेच्या मुख्याधिकारी टीना गवळी यांच्याकडे सोपविला आहे. पुढील आदेश येईपर्यंत मुख्याधिकारी पदाचा कार्यभार गवळी यांच्याकडे राहणार आहे. ते तथाकथित संभाषण कुरुंदवाड पालिकेचे मुख्याधिकारी चौहान यांना चांगलेच भोवले आहे.
पालिका मुख्याधिकारी आणि महिला अधिकारी यांच्यामध्ये झालेल्या संभाषणाची ध्वनीफिती व्हायरल झाली आहे. शहरवासीयांच्या भावना दुखावणारे वक्तव्य या ध्वनीफिती मधून पुढे आल्याने नागरिकांच्या भावना तीव्र झाल्या होत्या. नागरिकांनी पालिके समोर येत निदर्शने केली. यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव उगळे म्हणाले शहरात महापुर आला असुन नागरिक 10 दिवस झाले आपत्तीमुळे वैफल्य झाले आहेत.व्हायरल ध्वनीफितीमध्ये कुरुंदवाडवासियांचा त्यांनी अपमान केलेला आहे.त्यांना आम्ही पालिकेत येऊ देणार नाही असे सांगत त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत मुख्याधिकारी चौहान यांच्याशी संपर्क साधला असता मी जिल्हाधिकारी कार्यालयात असून याविषयी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही मुख्याधिकारी आशिष चौहान यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेवक राजू आवळे,बाबासाहेब सावगावे, बबलू पवार,तानाजी आलासे,आयुब पट्टेकरी आदींनी भाषणे केली. यावेळी दयानंद मालवेकर,दादासाहेब पाटील,उमेश कर्णाळे,संतोष नरके,आर्षद बागवान,रघु नाईक,सुरेश कांबळे, इकबाल बागवान आदी आंदोलनात सहभागी झाले होते.