

Kurundwad water leakage issue
कुरुंदवाड : इचलकरंजी कृष्णा पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य पाईपलाईनला कुरुंदवाड शहरात पुन्हा गळती लागली. त्यातून दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या गळतीच्या ठिकाणी आठ वर्षांपूर्वी शिकलगार समाजातील एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्याच ठिकाणी पुन्हा गळती निर्माण झाल्याने परिसरातील नागरिक आणि शिकलगार समाजबांधवांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
गळतीमुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचून डबके निर्माण झाले आहे, त्यातून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या पाण्यामुळे दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक समाजबांधवांनी इचलकरंजी पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून गळती तातडीने बंद करण्याची मागणी केली. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिल्याचा आरोप नागरिक गोपीनाथ शिकलगार यांनी केला आहे.
गेल्या आठ दिवसांपासून या गळतीचा प्रेशर वाढत असून, दररोज पाण्याचा प्रचंड अपव्यय होत आहे. तक्रारी करूनही दुरुस्तीचे कोणतेही प्रयत्न न झाल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात नाराजी वाढली आहे. मंगळवार सकाळपर्यंत गळती दुरुस्त न केल्यास कृष्णा पाणी योजनेचा पाणी पुरवठा बंद करून कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचा इशारा शिकलगार समाजाने दिला आहे.