

कोल्हापूर : जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने ‘एक दिवस आरोग्यासाठी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये विशेष मोहीम हाती घेऊन साथीच्या आजारांना कारणीभूत ठरणार्या जिल्ह्यातील सर्व जलस्रोतांची स्वच्छता करण्यात येणार असून, डास नियंत्रण आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी उपाययोजना आखण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात वारंवार काही गावांमध्ये साथीचे आजार पसरत असतात. यामध्ये प्रामुख्याने जलजन्य व कीटकजन्य आजारांचा समावेश आहे. दूषित पाण्यापुळे कॉलरा, अतिसार, कावीळ, टायफॉईड, पोटदुखी, उलट्या आदी आजार होत असतात, तर डासांचे प्रमाण वाढले की, हिवतापाचे रुग्ण वाढत असल्याचे दिसून येते. यासंदर्भात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी जिल्हा परिषद आरोग्य विभागाला विशेष अभियान राबविण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार जिल्हा परिषद आरोग्य विभागाने ‘एक दिवस आरोग्यासाठी’ हे अभियान आखले आहे.
यामध्ये सार्वजनिक ठिकाणे, शासकीय कार्यालये, शाळा, रुग्णालये तसेच ग्रामपातळीवर स्वच्छता उपक्रम राबविण्यात येणार आहे. नागरिकांना घराच्या परिसरात स्वच्छता राखण्याचे, साचलेल्या पाण्याचे निर्मूलन करण्याचे आणि डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांपासून बचावासाठी खबरदारी घेण्याकरिता जनजागृती करण्यात येणार आहे. याशिवाय एक दिवस आरोसेप्टिक टँक शौचालयाच्या व्हेंट पाईपला जाळी बसविण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींच्या मदतीने हा उपक्रम एकाच दिवशी राबविणार आहे.