

कोल्हापूर: शहराच्या शिवाजी पेठ परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. नंगीवली चौक ते वाशी नाका रोडवर घराच्या दारात खेळत असलेले एक पाळीव मांजर एका तरुणीने तरुणाच्या मदतीने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, कोल्हापूरमध्ये मांजर चोरीसारख्या घटनेमुळे परिसरात एकच चर्चा सुरू आहे.
एका घराच्या दारात मांजर निवांतपणे खेळत होतं. याचवेळी एक मुलगी फोनवर बोलत त्या रस्त्यावरून चालत आली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय, की तिचं लक्ष या मांजराकडे जाताच. काही सेकंदांसाठी तिने आजूबाजूला नजर टाकली आणि ते मांजर उचलून घेतलं.
मांजर हातात घेताच तिने लगेच तिथून पळायला सुरुवात केली. तरुणीला मदत करण्यासाठी पाठीमागून एक तरुण दुचाकी (टू-व्हीलर) घेऊन आला. ही मुलगी लगेच मांजरासह त्या तरुणाच्या गाडीवर बसली आणि दोघेही वेगाने तिथून पसार झाले.
मांजर चोरून घेऊन जातानाचा हा पुरावा देणारं सीसीटीव्ही फुटेज 'पुढारी न्यूज'च्या हाती लागलं आहे.
कोल्हापुरात पाळीव प्राणी चोरीच्या घटना तशा दुर्मिळच आहेत. मात्र, ही घटना समोर आल्यानंतर पाळीव प्राणी मालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शिवाजी पेठ परिसरातील या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा प्रकार ज्या पद्धतीने भरदिवसा आणि गजबजलेल्या वस्तीत घडली, त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
शिवाजी पेठ हा कोल्हापुरातील अत्यंत वर्दळीचा आणि जुन्या वस्त्यांपैकी एक भाग आहे. दिवसाढवळ्या, लोकांची ये-जा सुरू असताना, अगदी घराच्या दारात येऊन अशा प्रकारे पाळीव प्राणी चोरून नेण्याचे धाडस करणाऱ्या तरुणी आणि तरुणाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.