

कोल्हापूर : सोनवडे-शिवडाव मार्गावरील रस्त्याच्या 55/820 ते 56/820 या भागातील रखडलेल्या भूसंपादनास जमीन खासगी वाटाघाटीद्वारे खरेदी करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे भुदरगड तालुक्यातील दीर्घकाळ थांबलेल्या सोनवडे-शिवडाव रस्त्याच्या कामाला गती येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कोकणाला जोडणार्या सोनवडे-नाईकवाडी-शिवडाव मार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. कोल्हापूर व कोकणाला जोडणारा हा रस्ता असून, कोल्हापूरपासून सिंधुदुर्गपर्यंतचे अंतरदेखील कमी होणार आहे. परंतु, हा रस्ता वन विभागाच्या हद्दीतून जात असल्यामुळे त्यांची परवानगी आवश्यक असते. या रस्त्यामुळे स्थानिक जनतेला तसेच पर्यटनाला मोठा फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे शिवडाव, सोनवडे, गवसे, आंबेवाडी आदी गावांना थेट जिल्ह्याच्या मुख्य बाजारपेठेशी जोडणार आहे.
त्यामुळे परिसरातील शेतीमालाची वाहतूक सुलभ होणार आहे. तसेच या रस्त्यामुळे पर्यटन आणि औद्योगिक विकासालाही चालना मिळणार आहे. त्यामुळे हा रस्ता लवकर व्हावा, यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर प्रयत्न करत आहेत. त्यासाठी तांत्रिक सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणानुसार रस्त्याचे अलायमेंट निश्चित करण्यात येत असून, सुरक्षित व सुलभ प्रवासासाठी चढ-उतार कमी करण्यात येणार आहेत.त्यासाठी भूसंपादन गेल्या कित्येक दिवसांपासून रखडले होते. आता शासनाने या प्रकल्पासाठी लागणार्या जमिनीच्या भूसंपादनास तत्त्वतः मान्यता दिली आहे. या आदेशामुळे संबंधित जमिनींच्या बाजारभावानुसार मालकांना भरपाई देण्यात येणार असून, इच्छुक शेतकर्यांशी थेट वाटाघाटी करून जमीन हस्तांतरण करण्यात येईल. या प्रक्रियेत अनावश्यक प्रशासकीय विलंब टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.