

कुरुंदवाड : हेरवाड (ता. शिरोळ) येथे ग्रामदैवत श्री संतुबाई देवी यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पारंपरिक बैलगाडी शर्यतींमध्ये औरवाड येथील अशोक जंगम यांच्या 'पाखऱ्या–हरण्या' या बैल जोडीने मैदानात आपला दबदबा निर्माण करत प्रथम क्रमांक पटकावला. या विजयाबद्दल त्यांना एक लाख रुपयांचे भव्य रोख बक्षीस मिळाले.
माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर आणि दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांच्या हस्ते या थरारक शर्यतींचे उद्घाटन झाले. हेरवाडसह पंचक्रोशीतील हजारो शर्यतप्रेमींनी मैदानावर उपस्थिती लावून या पारंपरिक स्पर्धेचा मनमुराद आनंद घेतला. विशेष म्हणजे, या शर्यती शासनाच्या नियमांचे पालन करून, पूर्ण शांततेत आणि लाठी-काठीचा वापर न करता पार पडल्या.
‘अ’ गटात बाळू सरदार प्रथम, अमर शिंदे द्वितीय, अमोल चिगरे तृतीय आले. दुसऱ्या गटात अजित गावडे पहिला, करू गावडे दुसरा, लालू गावडे तिसरा, तर अरविंद फोटोग्राफर चौथा क्रमांक मिळवला. ‘दुस्सा–चौसा’ गटात सुशांत कदम प्रथम, शरद वाघमोडे द्वितीय, रोहित पुजारी तृतीय, तर दुसऱ्या गटात भिलवडी येथील पाटील डेअरी पहिला, शिवा कुरुड दुसरा आणि विशाल ओनेकर तिसरा क्रमांक मिळवला.‘ब’ गटात नितीन महाराज प्रथम, सतीश बेंद्रे द्वितीय, बंडा मामा शिंदेवाडी तृतीय; दुसऱ्या गटात प्रतीक पाटील पहिला, गणेश वाघमोडे दुसरा आणि बाळू पवार तिसरा क्रमांक मिळवला.
यावेळी सरपंच रेखा जाधव, उपसरपंच संतोष चिंदरकर, गटनेते दिलीप पाटील, भरत पवार, सचिन पाटील, शंकर बरगाले, बंडू पाटील, अर्जुन जाधव, तंटामुक्त समिती अध्यक्ष सुभाष देबाजे आदी मान्यवर उपस्थित होते.