

आशिष शिंदे
कोल्हापूर : कोल्हापूर - मुंबई राष्ट्रीय महामार्ग आता इंटेलिजेंट होणार आहे. वाहतुकीचे नियंत्रण अधिक प्रभावी आणि शिस्तबद्ध करण्यासाठी या मार्गावर इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (आयटीएमएस) उभारण्यात येणार आहे. ही यंत्रणा सीसीटीव्ही, ड्रोनच्या मदतीने हायवेवरील वाहनांवर नजर ठेवेल. यामुळे वाहतुकीचे नियम मोडणार्यांवर कारवाईसाठी स्वयंचलित ई- चलानदेखील आयटीएमएस यंत्रणेद्वारे पाठविले जाईल.
राज्यातील एकूण 9 राष्ट्रीय महामार्गांवर ही आधुनिक डिजिटल प्रणाली लागू होणार असून त्यासाठी 786 कोटी 69 लाख रुपये खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टममुळे हायवे स्मार्ट होणार आहे. सुरक्षितता, वेळेची बचत आणि वाहतुकीच्या नियमांच्या अंमलबजावणीसाठी ही प्रणाली एक टर्निंग पॉईंट ठरू शकते. या प्रकल्पा अंतर्गत राज्यातील 1 हजार 967 कि.मी. लांबीच्या 9 राष्ट्रीय महामार्गांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील प्रमुख वाहतूक केंद्रे मानल्या जाणार्या मुंबई-पुणे-कोल्हापूर-कागल महामार्गावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
ठाणे-आच्छाड, मुंबई-कागल, नाशिक-धुळे, पुणे - सोलापूर, पुणे - नाशिक, पुणे - छत्रपती संभाजीनगर, नागपूर - अकोला, नागपूर - चंद्रपूर, नागपूर - देवरी.
आयटीएमएस यंत्रणा विविध डिजिटल उपकरणांद्वारे काम करते. रस्त्यांवर बसवलेले अॅटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्नेशन (एएनपीआर) कॅमेरे वाहनांच्या नंबर प्लेट ओळखतात. स्पीड रडार, रेड लाईट व्हायोलेशन डिटेक्टर आणि ओव्हरलोड सेन्सर्समार्फत नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनांवर नजर ठेवली जाते. सर्व माहिती एक केंद्रीकृत कंट्रोल रूममध्ये प्रसारित होते, जिथे ती तपासली जाते आणि त्या आधारे ई-चलन पाठविले जाईल. ही यंत्रणा फोरजी, फाईव्हजी नेटवर्कवर चालत असल्यामुळे रिअल टाईम ट्रॅकिंग शक्य होते.