कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा : खिद्रापूर (ता. शिरोळ) येथे मौलाना अब्दुल कलाम आझाद योजनेतून एक लाख रुपये ४० टक्के अनुदानित व्यावसायिक कर्ज मिळवून देतो. ३०० रुपये प्रोसेसिंग फी भरा असे सांगून एका महिलेने तब्बल १०७ महिलांना गंडा घालून पोबारा केला आहे. या महिलेने कुरुंदवाड व परिसरातील ३०० हुन अधिक महिलांना गंडा घेतल्याची जोरदार चर्चा असून खळबळ उडाली आहे.
दरम्यान जागृत ग्रामस्थांनी ठकसेन महिला सांगत असलेल्या योजनेबाबत अशी कोणतीच योजना सुरू नसल्याचे समजल्यानंतर महिला पैसे गोळा करत असल्याच्या ठिकाणी जाब विचारण्यासाठी येत असल्याचे समजताच महिलेने पोबारा केला.
इचलकरंजी येथील महिलेने खिद्रापूर येथील एका महिलेशी संपर्क साधून मौलाना अब्दुल कलाम आझाद योजनेतून महिलांना एक लाख रुपये व्यावसायिक कर्ज योजना आली आहे. ४० हजार रुपये अनुदान म्हणून माफ होणार आहेत. १ हजार रुपये महिना प्रमाणे हफ्ता भरून ५ वर्षे भरणा करायची आहे.असे सांगून यासाठी प्रोसेसिंग फी म्हणून ३०० रुपये कर्ज मंजूर झाल्यानंतर ८ हजार रुपये मानधन द्यायचं अशी योजना सांगून चार दिवसांपूर्वी १०७ महिलांच्याकडून ३० ते ३५ हजार रुपये रक्कम घेऊन गेली. त्यासोबत २ फोटो, आधार कार्ड अशी कागदपत्रके घेतली आहेत.
बुधवारी (दि.४) दुपारी ४ वाजता महिला पुन्हा पैसे घेण्यासाठी आली होती. ७० महिला पैसे भरणा करण्यासाठी एकत्रित आल्या होत्या. त्याचवेळी ग्रा.प सदस्य इर्शाद मुजावर, जब्बार मोकाशी यांनी या योजनेबाबत माहिती घेतली अशी कोणतीच योजना नसल्याचे समजल्यानंतर सदर महिला पैसे गोळा करत असल्याच्या ठिकाणी गेले. दरम्यान महिलेने पैसे आणि कागदपत्रके टाकून पोबारा केला होता. हा प्रकार निदर्शनास आल्याने गावातील महिलेच्या मध्यस्थीने पैसे दिले आहेत. त्याला तुम्ही जबाबदार आहात असे सांगून पैशाची मागणी सुरू केली आहे. मात्र या प्रकाराने शिरोळ तालुक्यात खळबळ उडाली आहे.
मौलाना अब्दुल कलाम आझाद योजनेअंतर्गत अशी कोणतीच कर्ज योजना सध्या आलेली नाही. कुठेही कर्ज पुरवठा करण्यात येत नाही.अशी फी देखील घेतली जात नाही.
उदय कांबळे, जिल्हा व्यवस्थापक मौलाना अब्दुल कलाम आझाद योजना