कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : पाण्याची बाटली देण्यास नकार दिल्याने पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांनी मद्यधुंद अवस्थेत दगडाने डोके ठेचून सतीश महादेव पाटील (वय ४८, रा. कोरगावकर कंपाऊंडजवळ, शाहूपुरी, कोल्हापूर) यांचा खून केल्याची घटना सोमवारी पहाटे कोरगावकर कंपाऊंडजवळ घडली. शाहूपुरी पोलिसांनी मुख्य संशयित रोहन ऊर्फ चिक्या विजय गायकवाड (वय २४, रा. कनाननगर, कोल्हापूर) याच्यासह तिघांना बेड्या ठोकल्या.
याबाबत अधिक माहिती अशी की, सतीश पाटील हा कोरगावकर कंपाऊंडलगत एका हॉटेलजवळ राहतो, प्रिंटिंग प्रेससह मिळेल ती कामे करतो. रविवारी रात्री उशिरा भाऊ सागर पाटील यांच्या घरात जेवण करून झोपण्यासाठी हातात पाण्याची बाटली घेऊन रेल्वे स्टेशनसमोरील कोरगावकर कंपाऊंडलगत एका दुकानाजवळ येऊन थांबला होता. संशयित रोहन गायकवाडने सतीशकडे पाण्याच्या बाटलीची मागणी केली, सतीशने बाटली देण्यास नकार दिला, गायकवाड तेथून निघून गेला. दहा-पंधरा मिनिटांनंतर गायकवाड, सौरभ जाधव व दोन साथीदारांसमवेत तेथे आला. तिघांनीही सतीशला शिवीगाळ केली. त्याच्या अंगावर धावून गेले. त्यांच्यात झटापट झाली. हल्लेखोरांनी सतीशच्या डोक्यात मोठा दगड घातला. वर्मी घाव लागल्याने सतीश जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. सतीशची हालचाल थांबल्याने तिघेही तेथून पसार झाले. जाताना तिघांनीही तेथील वाहनांच्या काचा फोडल्या.
निवडणूक आचारसंहिता आणि ऐन दिवाळीच्या तोंडावर शहरातील मध्यवर्ती रेल्वे स्टेशनसमोर खुनाची घटना घडल्याने सोमवारी सकाळी शहरात खळबळ उडाली. शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके, पोलिस निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांच्यासह अधिकाऱ्यांनी पाहणी केली. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. रोहन ऊर्फ चिक्या गायकवाड, सौरभ दीपक जायव (वय २३, रा. कनाननगर) अशी अटक केलेल्या मारेकऱ्यांची नाते आहेत. सौरभ जाधव याच्यावर पोलिसांनी यापूर्वी हदपारीची कारवाई केली आहे. विक्रमनगर येथील एका बाल संशयितालाही ताब्यात घेतले आहे. रोहन गायकवाड सौरभ जाधव, अशी त्यांची नावे असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.
पहाटेच्या सुमाराला अनोळखी व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर पडल्याचे वृत्तपत्र विक्रेत्याच्या निदर्शनास आले. विक्रेत्याने सतीशला ओळखले व घटनेची माहिती दिली. नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांनी बेशुद्ध अवस्थेतील सतीशला तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
पोलिस उपअधीक्षक अजित टिके, पोलिस निरीक्षक अजयकुमार सिदकर घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. हल्लेखोरांनी दगडाने ठेवून खून केल्याचे फुटेज पोलिसांना आढळून आले. चौकशीअंती संशयितांची नावेही निष्पन्न झाली. तिघेही पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पुढे आली. गायकवाडला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने अन्य दोन साथीदारांची नावे सांगितली. दोघांकडे चौकशी केली असता तिघांनीही खुनाची कबुली दिली. गायकवाड व जाधव हे सराईत गुन्हेगार आहेत.
दगडाने ठेवून खून झालेला सतीश मूळचा हसूर दुमाला (ता. करवीर) येथील असून लहानपणापासून तो व त्याचा भाऊ सागर याचे रेल्वे स्टेशनसमोर कोरगावकर कंपाऊंडजवळ वास्तव्य आहे. काही वर्षांपूर्वी सतीशने विक्रमनगर येथे टुमदार बंगला बांधला असून तेथे पत्नी व दोन मुलांचे वास्तव्य असते. अधून मधून सतीश विक्रमनगरला जात असे. मात्र, बहुतांशी काळ त्याचे शाहूपुरीत वास्तव्य असायचे, सतीशचा खून झाल्याचे समजताच पत्नीसह मुलांनी आक्रोश केला.