विशाळगड : शाहूवाडी व पन्हाळा तालुक्यातील ६२ गावांना सुजलाम् सुफलाम् करणारा कासारी मध्यम प्रकल्प रविवारी पहाटे १०० टक्के भरला. धरण पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या गावांचा पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. गतवर्षी हे धरण १ सप्टेंबरलाच भरले होते. धरण भरल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. धरणातून ३०० क्यूसेस पाण्याचा विसर्ग कासारी नदीपात्रात सुरू आहे. १ जूनपासून आजअखेर पाणलोट क्षेत्रात ४७९९ मिमी पाऊस तर मागील २४ तासांत २३ मिमी पावसाची नोंद झाली. यवलूज, कांटे, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपन, वालोली हे बंधारे पाण्याखाली गेल्याची माहिती शाखा अधिकारी एस. एस. लाड व मोजणीदार आय.जी.नाकडे यांनी दिली.
कासारी मध्यम प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता २.७७ टीएमसी आहे. शाहुवाडीतील २१ व पन्हाळ्यातील ४१ गावांतील ९४५८ एकर सिंचन क्षेत्राला हा प्रकल्प जीवनदायी ठरला आहे. धरण क्षेत्रात दरवर्षी अतिवृष्टी होते. यावर्षी धरण जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच भरण्याच्या मार्गावर होते. मात्र धरण प्रशासनाने योग्य नियोजन करून धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवत कासारी नदीकाठावरील गावांना दिलासा दिला होता. मे महिन्यात धरणाचा पाणीसाठा १६ टक्के इतका खाली आला होता. जूनअखेर बरसलेल्या सरींनी तो २९ टक्के झाला. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे धरणात जुलैअखेर ८३ टक्के पाणीसाठा होता.
सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी गेळवडे व गजापूर या गावांचे पुनर्वसन करून ३८०.३० मीटर लांबीचा व ३३.२८ किमीच्या पाणलोट क्षेत्रात ७८.५६ दलघमी पाणी साठवण क्षमतेचा हा प्रकल्प साकारला. धरणाचे बुडित क्षेत्र ७७०.६१ हेक्टर आहे. २०१० पासून २.५ मेगावॅटचा वीज निर्मिती प्रकल्प धरणावर सुरू आहे. गतवर्षी याच दिवशी ३७०९ मिमी पाऊस बरसला होता. यावर्षी आजअखेर ४७९९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणातून ३०० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा धरण प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, कासारी पाणलोट क्षेत्रातील पोंबरे, पडसाळी, कुंभवडे नांदारी, सोनुर्ले, केसरकरवाडी आदी लघुपाटबंधारे प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने थोडी उघडीप दिल्याने रिमझिम पाऊस बरसत आहे. धरणात २.७७ टीएमसी पाणीसाठा आहे. पाण्याची पातळी ६२३ मीटर तर एकूण पाणीसाठा ७८.५६ दलघमी आहे.