

मुदाळतिट्टा, शाम पाटील:
एस टी महामंडळातर्फे राबविण्यात येत असलेल्या हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानामध्ये दुसऱ्या सर्वेक्षणाअंती कोल्हापूर विभागातील ४ बसस्थानके प्रादेशिक पातळीवर वरच्या क्रमांकावर आहेत. पुणे प्रदेशात अ गटामध्ये इचलकरंजी दुसऱ्या क्रमांकावर आहे. ब गटांमध्ये गारगोटी दुसऱ्या क्रमांकावर तर गडहिंग्लज बसस्थानक तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच क गटांमध्ये मुरगुड बसस्थानक हे देखील दुसऱ्या क्रमांकावर आहे.
२३ जानेवारी २०२५ रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने हे स्वच्छता अभियान एस टी महामंडळाच्या ५६८ बसस्थानकावर राबविण्यात येत आहे. वर्षभर चालणाऱ्या या अभियाना अंतर्गत दर ३ महिन्यांनी प्रत्येक बसस्थानकाचे मूल्यांकन करून त्यांना गुण दिले जातात. त्यानुसार पहिल्या सहा महिन्यात झालेल्या दोन सर्वेक्षणात कोल्हापूर जिल्ह्यातील २२ बसस्थानकांचे मूल्यांकन करण्यात आले. त्यापैकी इचलकरंजी हे बसस्थानक ८६ गुण मिळवून पुणे प्रदेशांमध्ये अनुक्रमे दुसऱ्या क्रमांकावर आले असून या गटात पहिला क्रमांकावर बारामती (९६ गूण) बसस्थानक आहे. याबरोबरच ब गटातील स्पर्धेमध्ये सोलापूर जिल्ह्यातील अकलूज बसस्थानक पहिल्या क्रमांकावर असून कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी बसस्थानक ९४ गुण मिळवून पुणे प्रदेशात दुसऱ्या क्रमांकावर आले असून गडहिंग्लज (९४ गुण) बसस्थानक तिसऱ्या क्रमांकावर आहे.
या गटातील तीनही बसस्थानकांना समान गुण मिळाले असून बस फेऱ्यांची संख्या जास्त असल्याने पहिला क्रमांक अकलूज बसस्थानकाने पटकावला आहे. तसेच क गटामध्ये मुरगुड बसस्थानक ९२ गुण मिळवून दुसऱ्या क्रमांकावर आले असून या गटात सातारा जिल्ह्यातील मेढा बसस्थानक ९७ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. 'लोकसभागातून बसस्थानकांचा विकास ' या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या अभियानामध्ये त्या गावातील स्थानिक स्वराज्य संस्था, तरुण मंडळे, दानशूर व्यक्ती यांच्या पुढाकारातून त्या बसस्थानकाचा विकास करणे अपेक्षित आहे.
मुरगुड बसस्थानकावर नगरपालिकेच्या माध्यमातून तब्बल १०० पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारचे झाडे लावण्यात आली असून ती चांगल्या पद्धतीने जोपासले आहेत. तसेच बसस्थानकाची रंगरंगोटी व सुशोभीकरण 'कुबेर रिअल इस्टेट' या संस्थेकडून विनामुल्य करून देण्यात आले आहे. याबरोबरच एसटी प्रशासनाच्या माध्यमातून अनेक लांब पल्ल्याच्या बस फेऱ्या सुरू करण्यात आलेले आहेत. तसेच भविष्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तरी निमित्त " मोफत खुला वाचन कट्टा " देखील सुरू करण्यात येत आहे. या अभियानाचे उर्वरित सहा महिने बाकी असून अजून दोन सर्वेक्षण होणे अपेक्षित आहे. उर्वरित सर्वेक्षणात चांगले गुण पडल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड सह इतर बसस्थानके राज्यपातळीवर वरच्या क्रमांकात झळकली ,यात शंका नाही.