कोल्हापूर : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त जुना बुधवार पेठ येथील शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने पंचगंगा घाट परिसरात बुधवारी पहाटे दीपोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटे साडेतीन वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनाने या दिव्य सोहळ्याची सुरुवात झाली. त्यानंतर घाट परिसरात 51 हजार पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या. त्यामुळे पंचगंगा नदी घाट तेजोमय प्रकाशात न्हाऊन निघाला. दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेच्या पहाटे दीपोत्सव साजरा केला जातो.
या दीपोत्सवप्रसंगी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे, माजी भाजप महानगराध्यक्ष संदीप देसाई, अभिषेक बोंद्रे, ऐश्वर्या मुनीश्वर, प्रताप जाधव, प्रकाश गवळी, अफजल पिरजादे, नेपोलियन सोनवणे, धीरज काटकर, अविनाश साळोखे, सुशील भांदिग्रे, राजेंद्र करंबे, अनिरुद्ध कोल्हापुरे आदी मान्यवर उपस्थित होते.
पंचगंगा घाटावर हजारो नागरिक मंगळवारी मध्यरात्रीपासून येण्यास सुरुवात झाली. नदी परिसरात आकर्षक रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. फुलांच्या पाकळ्यांनी घाटाच्या पायर्या सुशोभित करण्यात आल्या होत्या. शहरातील विविध पर्यटनस्थळांच्या प्रतिकृती मांडण्यात आल्या होत्या. दीपोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक संदेश फलक उभारण्यात आले होते. रात्री 11 वाजल्यापासून दीपोत्सवासाठी सजावट करण्यात येत होती, तर रात्री तीन वाजल्यानंतर पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात प्रज्वलित झालेल्या हजारो पणत्यांमुळे घाट परिसरात दिव्य आणि भक्तिमय वातावरणाचे दर्शन घडले.
दीपोत्सवाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी रात्री विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रांगोळ्यांचे प्रदर्शन, कराओके सादरीकरण, भक्तिगीतांचा कार्यक्रम, भव्य आतषबाजी तसेच परिसरातील प्राचीन मंदिरांवरील आकर्षक रोषणाईने वातावरण उत्साहपूर्ण बनले. पहाटे पाच वाजता रणजित बुगले यांच्या भावभक्ती गंध वाद्यवृंद सादरीकरणाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमाविषयी बोलताना शिवमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक देसाई म्हणाले, पंचगंगा घाटावरील दीपोत्सव हा आता कोल्हापूरच्या सांस्कृतिक ओळखीचा भाग बनला आहे. श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा हा लोकोत्सव जनतेच्या सहभागातून यशस्वी होत आहे.
नीलेश जाधव, अक्षय मिठारी, रोहित गायकवाड, राज कापसे, प्रवीण चौगुले, अक्षय मोरे, विनोद हजारे, ऋतुराज पाटील, अजिंक्य सूर्यवंशी, अशोक बुटके, बाळू गुरव, आशिष पाटील, इंद्रजित गोसावी, सूरज पालवकर, रोहित शेटे, धनंजय जरग, विक्रम सरनोबत, पारस पालीचा आणि रोहित पाटील यांच्यासह प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.