

कोल्हापूर : जुलैच्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यातील धरणे सरासरी 87 टक्के भरली आहेत. जिल्ह्यातील प्रमुख 17 धरणांत 72.13 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी याच दिवशी धरणात 37.62 टीएमसी पाणीसाठा होता, तर धरणे सरासरी 55.8 टक्के भरली होती. यावर्षी तुलनेत 31.25 टक्के जादा पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील आठ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. उर्वरित नऊ प्रकल्पही या हिनाअखेरपर्यंतच पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. धरणातील पाणीसाठा असाच वाढत राहिला आणि पावसाचाही जोर वाढला तर याच महिन्यात जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा, जांबरे, आंबेओहळ, सर्फनाला, धामणी आणि कोदे ही आठ धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. गतवर्षी जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात केवळ दोनच धरणे पूर्ण क्षमतेने भरली होती.
राधानगरी धरण 78 टक्के भरले आहे. धरणात 6.48 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी याच दिवशी राधानगरी धरण 39 टक्केच भरले होते. त्यात केवळ 3.29 टीएमसी पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी 38 टक्के जादा पाणीसाठा झाला आहे. धरणात वेगाने पाणीसाठा वाढत असल्याने गेल्या काही दिवसांपासून या धरणातून पाण्याचा 3100 क्युसेक विसर्ग सुरू आहेच. तरीही धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर आहे. तो कायम राहिला तर जुलैच्या दुसर्या, तिसर्या आठवड्यातच राधानगरी धरणही पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.
प्रमुख 17 पैकी 16 धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. केवळ चिकोत्रा धरणातून पाणी सोडले जात नाही. सर्वच धरणांतून पाणी सोडले जात असल्याने त्यावरील नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ होत आहे. राधानगरी, तुळशी, कुंभी, कासारी, कोगे धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पंचगंगेची पाणी पातळी संथ गतीने कमी होत आहे.