

इचलकरंजी : बारमध्ये वेटरशी झालेल्या किरकोळ वादातून एका बँकेचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक अभिनंदन जयपाल कोल्हापुरे (44, रा. इंदिरा हौसिंग सोसायटी, कबनूर) यांचा सिमेंटचा नळा डोक्यात घालून खून करण्यात आला. ही घटना सोमवारी मध्यरात्री कबनूर-कोल्हापूर रस्त्यावरील एका पेट्रोल पंपासमोर घडली.
दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या आठ तासांत या खुनाचा छडा लावला. या प्रकरणी पंकज संजय चव्हाण (27, रा. फॅक्टरी रोड कबनूर), रोहित जगन्नाथ कोळेकर (24, रा. श्रद्धा हायस्कूल शेजारी, कागल), विशाल राजू लोंढे (31) आणि आदित्य संजय पोवार (21, दोघे रा. लालनगर, इचलकरंजी) या चार संशयितांना अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी दिली.
कबनूर येथे राहणारे अभिनंदन कोल्हापुरे एका बँकेत वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. सोमवारी रात्री दोनच्या सुमारास तीन ते चार मित्रांसह संशयित पंकज चव्हाण हा अभिनंदन यांच्या घरी आला. त्याने हॉटेल वैशाली येथे भांडण झाले असून अभिनंदनला पोलिस ठाण्यात घेऊन जायचे असल्याचे सांगून सोबत नेले. बराच वेळ तो न परतल्याने अभिनंदन कोल्हापुरे यांचा भाऊ डॉ. अभिषेक व कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. संशयित पंकज चव्हाण याच्या भावानेही शोध सुरू केला. दोघांनाही कबनूर येथील पेट्रोल पंपाजवळ अभिनंदन रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे निदर्शनास आले. अभिनंदन यांच्या डोक्यात गंभीर दुखापत होती. डॉ. अभिषेक कोल्हापुरे यांनी तपासून पाहिले असता अभिनंदनचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. इंदिरा गांधी रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. यावेळी नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. कोल्हापुरे यांच्या मागे आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
दरम्यान, जयसिंगपूर रस्त्यावरील चौंडेश्वरी फाटा येथे चौघाही संशयितांना ताब्यात घेण्यात आले. अधिक चौकशी केली असता कबनूर परिसरातील हॉटेल वैशाली येथे रोहित कोळेकर हा वेटर म्हणून काम करतो. त्याठिकाणी त्याचा अभिनंदन याच्याशी वाद झाला होता. त्याने कोळेकर याला शिवीगाळ केल्याच्या रागातून साथीदारांच्या मदतीने त्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले. ही कारवाई उपनिरीक्षक शेष मोरे, अतिश म्हेत्रे, महेश खोत, महेश पाटील, अनिल जाधव, सागर चौगले व सुरेश राठोड यांच्या पथकाने केली.
संशयित रोहित कोळेकर व पंकज चव्हाण हे मित्र आहेत. कोळेकर याने चव्हाण याला वाद झाल्याचे सांगून बोलावून घेतले. सिमेंटचा नळा डोक्यात वर्मी बसल्याने अभिनंदन यांचा जागीच मृत्यू झाला. पंकज चव्हाण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी दोन गुन्हे दाखल आहेत. घटनास्थळावरून सिमेंटचा नळा पोलिसांनी जप्त केला आहे.