तुरंबे/राशिवडे : मुलींची संख्या कमी असल्याने मुलांचे लग्न होणे अवघड झाले आहे. अशातूनच फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. राधानगरी तालुक्यातील बारडवाडी येथील रमेश गजानन बारड याचे लग्न सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील राधा देशमुख ऊर्फ सोनाली कोल्हाळ हिच्याशी झाले होते. मात्र, अंगाची हळद निघायच्या आधीच नववधू दागिने घेऊन पसार झाली होती. नवरीही नाही आणि दागिनेही गेले, यामुळे बारड कुटुंब हतबल झाले होते. यात बारड कुटुंबीयांची सुमारे चार लाख 16 हजारांची फसवणूक झाली होती. अखेर राधानगरी पोलिसांनी याचा छडा लावून, यातील दोन महिलांसह तीन संशयितांना अटक केली.
बारडवाडी येथील रमेश बारड याचे लग्न मोहोळ येथील राधा देशमुख ऊर्फ सोनाली कोल्हाळ हिच्याशी 26 एप्रिल 2024 रोजी झाले होते. लग्न ठरवून देतो, असे सांगून सुवर्णा अमोल बागल, अमोल शहाजी बागल (रा. जवाहरनगर, नाईकवाडी वस्ती, मोहोळ, जि. सोलापूर) यांनी बारड कुटुंबीयांकडून एक लाख 60 हजार रुपये घेतले होते. यानंतर या दोघांचे मोहोळ येथेच लग्न झाले. लग्नावेळी नववधूच्या अंगावर स्त्रीधन म्हणून सोने घातले होते. यानंतर नवदाम्पत्य बारडवाडी येथे आले आणि 27 एप्रिलच्या रात्री नववधू राधा ऊर्फ सोनाली बारड यांच्या घरातून दागिन्यांसह पसार झाली. या दागिन्यांची किंमत सुमारे दोन लाख 56 हजार रुपये इतकी होती. नव्या नवरीच्या अंगाची हळदसुद्धा निघाली नसताना, तिने चार लाख 16 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे बारड कुटुंबीयांच्या लक्षात आले. यानंतर पांडुरंग गजानन बारड यांनी राधानगरी पोलिसांत फसवणुकीची तक्रार दिली. पोलिस निरीक्षक संतोष गोरे आणि त्यांच्या पथकाने या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सोलापूरच्या दिशेने पथके रवाने केली; पण या त्रिकुटाचा ठावठिकाणा लागत नव्हता. अखेर अथक प्रयत्नांनंतर तीन संशयितांना पकडण्यात राधानगरी पोलिसांना यश आलेे. मात्र, या घटनेमुळे बारड कुटुंबीयांची झालेली वाताहत वेगळीच झाली. मुलाचे लग्न ठरवून नवीन मुलगी घरात येऊ दे, त्यांचा संसार सुखाने फुलदे, यासाठी अगदी आनंदाने सर्व खर्च नवर्याकडील मंडळींनी केला होता. मात्र, या टोळीने बारड कुटुंबीयांची फसवणूक केली.
दरम्यान, या संशयितांनी आणखी किती कुटुंबांची अशा पद्धतीने फसवणूक केली आहे, याचा पोलिस तपास करत आहेत. अधिक तपास पोलिस निरीक्षक संतोष गोरे, उपनिरीक्षक खंडू गायकवाड, दिगंबर बसरवाडकर करत आहेत.