

कोल्हापूर : सन 2024-25 या वर्षात राज्यातील 31 हजार विद्यार्थ्यांना 38 कोटी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एनएमएमएस) रकमेचे वितरण केंद्र शासनाने थेट बँक खात्यावर केले आहे. महाराष्ट्र राज्यातील आरक्षणानुसार संबंधित प्रवर्गातील विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. राज्यात सर्वात जास्त कोल्हापूरमधून 1,703 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे, तसेच सर्वात कमी मुंबई दक्षिणमधून 45 विद्यार्थांची निवड झाली आहे.
महाराष्ट्र राज्यात केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (छचचड) अंतर्गत अपेक्षित 40,550 पैकी एकूण 36 हजार 376 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 35,414 अर्जांची पडताळणी पूर्ण झाली असून, नवीन 8937 आणि नूतनीकरण 22730 अशा 31,667 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 12 हजार रुपये शिष्यवृत्ती वितरित करण्यात आली.
शिक्षण मंत्रालय, भारत सरकारच्या वतीने पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा केली जात आहे. उर्वरित सुमारे 3 हजार 700 विद्यार्थ्यांनाही टप्प्याटप्प्याने शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे, त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांचे बँक खाते आधार क्रमांकासोबत सीडिंग केलेले नाही, त्यांनी तत्काळ आधार सीडिंग प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा त्यांच्या खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा होणार नाही. विद्यार्थ्यांनी आपले आधार-सीडेड खाते तपासून आवश्यक ती दुरुस्ती करावी, असे आवाहन योजना शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी केले आहे.
राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही शिष्यवृत्ती दिली जाते. विद्यार्थ्यांनी आपली बँक खाते माहिती अद्ययावत ठेवावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.