

कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील एकूण 63 मंडलांत 382 गावांमध्ये 12,125.57 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या आपत्तीमुळे 47 हजार 903 शेतकर्यांचे नुकसान झाले असून या शेतकर्यांसाठी 18 कोटी 30 लाख 40 हजार रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे.
बाधित शेतकर्यांपैकी 12 हजार 184 शेतकर्यांना 6 कोटी 61 लाख 90 हजार रुपयांची मदत वितरित केली असून 806 शेतकर्यांच्या खात्यात 45 लाख 90 हजार रुपये जमा झाले आहेत. 11 हजार 306 शेतकर्यांची ई-केवायसी प्रलंबित असून 6 कोटी 11 लाख 76 हजार रुपयांचे अनुदान देय आहे. शेतकर्यांनी आपली ई-केवायसी तत्काळ करून घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.अतिवृष्टीमुळे 27 गावे स्थलांतरित केली असून 719 कुटुंबांचे पुनर्वसन केले आहे. आपत्तीत मयत झालेल्या 7 व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी 4 लाख रुपयांप्रमाणे मदत वितरित केली आहे. स्थलांतरित 187 कुटुंबांना प्रत्येकी दहा हजार रुपये प्रमाणे 18 लाख 70 हजार रुपये वितरित केले आहेत. उर्वरित 532 कुटुंबांना अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू आहे.
अतिवृष्टीमुळे सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीत जिल्ह्यातील शाळा, रस्ते, स्मशानभूमी, अंगणवाडी, ग्रामपंचायती व इतर विभागांचे नुकसान झाले आहे. त्या अनुषंगाने शासन स्तरावर मागणी करण्यात आली असून यासाठीही निधी उपलब्ध केला जाणार आहे. पालकमंत्री आबिटकर यांनी संबंधित विभागांना तातडीने मदत वाटपाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सर्व शेतकर्यांची ई-केवायसी त्वरित पूर्ण करून मंजूर अनुदान थेट त्यांच्या खात्यात जमा करण्यावर भर देण्याचे आदेशही दिले.