कुरुंदवाड : शिवणाकवाडी (ता.शिरोळ) येथील अनिल खोत हे नोकरी निमित्त जर्मनी येथे आपल्या पत्नी-मुलासह राहत असून जर्मनीमधील आपल्या घरात मोठ्या थाटात गणेशोत्सव साजरा केला. कुरुंदवाड येथील अमर कुंभार यांनी घडवलेली कमळारूढ गणेशमूर्ती विमानाने आल्यानंतर त्यांनी मंगलमय वातावरणात गणेशाची प्रतिष्ठापणा केली.
शिवणाकवाडी येथील अनिल वसंत खोत हे जर्मनी येथील फोक्स वेगन या कंपनीत सेवेत आहेत.त्यांच्याशी कुरुंदवाड येथील रघुनाथ कल्लाप्पा गावडे यांची कन्या सुनीता यांच्याशी विवाह झाला. हे पती-पत्नी आपल्या मुलांसह गेल्यावर्षी जर्मनीत स्थायिक झाले. यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करायचा म्हणून त्यांनी सासरे रघुनाथ गावडे यांच्याशी संपर्क साधून विमानाने गणेशमूर्ती पाठवण्याची विनंती केली. आणि प्रतिष्ठापणीच्या एक दिवस आधी 'बाप्पा' जर्मनीत पोहोचले. भक्तिमय वातावरणात धार्मिक विधीने गणरायाची त्यांनी घरी प्रतिष्ठापना केली.