कोल्हापूर : केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीमध्ये संपूर्ण नाट्यगृह जळून खाक झाले. या आगीनंतर नाट्यगृहामध्ये पडलेला मलबा (राडारोडा) अद्यापही नाट्यगृहात पडून आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यासह विविध नेते, अधिकार्यांच्या भेटी, स्ट्रक्चर ऑडिट, इन्शुरन्स अधिकार्यांच्या भेटीवेळीही हा मलबा पडूनच होता. इन्शुरन्सच्या दाव्याची प्रक्रिया व पाहणी पूर्ण झाल्यानंतरच हा मलबा नाट्यगृहातून बाहेर काढला जाणार आहे.
केशवराव भोसले नाट्यगृहाला 8 ऑगस्टला आग लागली. या आगीमध्ये नाट्यगृह जळून खाक झाले. या घटनेनंतर राज्यभरात हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यानंतर या घटनेचे पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह कोल्हापुरातील स्थानिक नेतेमंडळी नाट्यगृहाला भेट देण्यासाठी धावले. नाट्यगृह जसेच्या तसे उभा करण्याच्या घोषणा या नेत्यांनी केल्या आहेत. त्यानंतर महापालिका प्रशासनाने याची तयारी सुरू केली आहे. पहिल्या टप्यात या इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट करण्यात आले. संपूर्ण नाट्यगृहाचे नमुने घेण्यात आले असून सद्य:स्थितीत या इमारतीची स्थिती काय याबाबत अहवाल दिला जाणार आहे. तसेच विमा कंपनीच्या प्रतिनिधीनींही नाट्यगृहाला भेट दिली आहे. परंतु या नाट्यगृहाला आग लागल्यानंतरचा मलबा अद्यापही या इमारतीत पडूनच आहे.