

कोल्हापूर : मुंबईत सोमवारी झालेल्या नगराध्यक्षपदाच्या सोडतीत कागल, मलकापूर, पन्हाळा, मुरगूड आणि कुरुंदवाडचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी तर शिरोळचे नगराध्यक्षपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव झाले. दोन नगर परिषदा आणि जिल्ह्यातील तीनही नगर पंचायतींचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव राहिले आहे. नगराध्यक्षपदाच्या सोडतीनंतर ‘कहीं खुशी कहीं गम’ असे चित्र असून बुधवारी (दि. 8) होणार्या प्रभागनिहाय आरक्षण सोडतीकडे सार्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, 10 पैकी 6 नगर परिषदेत आता महिलाराज येणार आहे. वडगाव, जयसिंगपूर, हातकणंगले, आजरा, चंदगड या नगरपालिका, नगर पंचायतीचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी असल्याने जोरदार चुरस होणार आहे.
नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी गतीने सुरू आहे. प्रभागरचना अंतिम झाल्यानंतर नगराध्यक्षपदांची सोडत सोमवारी काढण्यात आली. जिल्ह्यात दहा नगर परिषदा आहेत. त्यातील सहा नगर परिषदांचे नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव राहिले. उर्वरित चार नगर परिषदांपैकी गडहिंग्लज आणि हुपरी या नगर परिषदेचे नगराध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव राहिले. जयसिंगपूर आणि वडगाव नगर परिषदेचे नगराध्यक्षपद खुले राहिल्याने या दोन नगर परिषदेत मोठी चुरस निर्माण होणार आहे. जिल्ह्यातील चंदगड, आजरा आणि हातकणंगले या तीनही नगर पंचायतींचे नगराध्यक्षपद खुले राहिले. यामुळे नगराध्यक्षपदाची निवडणूक चुरशीने होईल, अशी शक्यता आहे.
या सोडतीनंतर अनेकांचा अपेक्षाभंग झाला. कोरोना कालावधीनंतर लांबलेल्या निवडणुका होत असतानाच नगराध्यक्षपदासाठी तयारी करणार्याा अनेकांच्या स्वप्नांवर पाणी पडले आहे. नगराध्यक्षपदाची सोडत जाहीर झाल्यापासून अनेकांची घालमेल सुरू होती. मनासारखे आरक्षण पडावे यासाठी अनेकांनी देव पाण्यात घातले होते. वेगवेगळ्या मार्गाने साकडेही घातले होते. सोडत जाहीर झाल्यानंतर मनासारखे आरक्षण पडलेल्यांनी जल्लोष केला तर अनेकांच्या गोटात नाराजीचे वातावरण पसरले.
आरक्षण सोडतीनुसार निर्माण झालेल्या नव्या चित्रानुसार जिल्ह्यात राजकीय फेरमांडणीला आतापासूनच सुरुवात झाली आहे. राखीव प्रवर्गानुसार गटा-तटासह राजकीय पक्षांच्या स्थानिक नेतृत्वांनी सक्षम उमेदवारांचा शोध सुरू केला आहे. शहराची सत्ता आपल्याच ताब्यात राहावी, यासाठी आपलाच नगराध्यक्ष व्हावा याकरिता आतापासूनच आखाडे बांधत संबंधितांशी संपर्क सुरू केला आहे.
प्रभाग आरक्षण सोडत उद्या
नगराध्यक्षपदाच्या सोडतीनंतर आता सर्वांच्या नजरा बुधवारी (दि. 8) होणार्या प्रभागनिहाय आरक्षण सोडतीकडे लागल्या आहेत. नगराध्यक्षपदाची संधी हुकलेल्या अनेकांनी आपल्या प्रभागाची सोडत तरी किमान अनुकूल व्हावी अशी अपेक्षा अनेकांना आहे. त्यामुळे या सोडतीबाबतची उत्कंठा वाढली आहे.
असे आहे आरक्षण...
नगर परिषद : सर्वसाधारण खुला
प्रवर्ग : जयसिंगपूर, वडगाव.
अनुसूचित जाती : गडहिंग्लज, हुपरी.
अनुसूचित जाती महिला : शिरोळ.
सर्वसाधारण महिला : कागल, मलकापूर,
पन्हाळा, मुरगूड, कुरुंदवाड.
नगर पंचायत : सर्वसाधारण खुला
प्रवर्ग : चंदगड, आजरा, हातकणंगले