

हुपरी : पट्टणकोडोली येथील श्री विठ्ठल बिरदेव देवाच्या यात्रेवेळी दर्शनासाठी आलेल्या महिलांच्या अंगावरील लाखो रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याच्या घटना घडल्या. त्यापैकी केवळ पाच महिलांनी 4 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची नोंद हुपरी पोलिसांत दिली आहे. काही चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते, पण किरकोळ कारवाई करून सोडून दिले.
रविवारी फरांडेबाबांची भाकणूक होती. त्यामुळे विविध राज्यांतून लाखो भाविक आले होते. गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी दागिन्यांवर डल्ला मारला. त्यापैकी नीलाबाई रावसो पाटील (वय 60, रा. कसबा सांगाव, ता. कागल) यांच्यासह पाच महिलांनी फिर्याद दिली आहे. त्यामध्ये मणिमंगळसूत्र, बांगड्या, कर्णफुले असे दागिने चोरीस गेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी तक्रार दाखल करायला आलेल्यांना हुपरी पोलिसांकडून हुपरी, पट्टणकोडोली अशा चकरा मारायला लावणे, ताब्यात घेतलेल्या चोरट्यांवर कारवाई न करता सोडून दिल्याचा आरोप अन्यायग्रस्तांकडून करण्यात येत आहे.