मुंबई : पुढारी वृत्तसेवा
जन्मदात्या आईची निघृण हत्या करून तिचे काळीज व अन्य अवयव भाजून खाण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुनील कुचकोरवी या नराधम मुलाला फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने मंगळवारी कायम ठेवली. गुन्ह्याचे वर्णन न्यायालयाने अपवादात्मक असे केले आणि दोषीला जन्मठेप दिली तर तो त्याची वृत्ती सोडणार नाही. सहकैद्यांसाठीही तो या अंगाने धोकादायक ठरू शकतो, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.
न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. दोषीने केलेला गुन्हा हा दुर्मिळातील दुर्मीळ आहे, अशा गुन्ह्यातील आरोपीला माफी नाही. नरभक्षक प्रवृत्तीला ठेचण्याचीच गरज आहे, असेही न्यायालयाने नमूद केले. सुनील कुचकोरवी याला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश महेश कृष्णाजी जाधव यांनी जुलै २०२१ मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती. या निकालावर उच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले.
कोल्हापूर न्यायालयाच्या निकालाला सुनील याने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. राज्य सरकारनेही फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती सुनीलला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे खंडपीठासमोर हजर करण्यात आले होते.
महापालिकेचे निवृत्त कर्मचारी रामा कुचकोरवी-माने यांचा सुनील हा मोठा मुलगा. वयोवृद्ध माता, पत्नी लक्ष्मी व चार मुलांसह माकडवाला वसाहतीत पत्र्याच्या शेडमध्ये तो राहात होता. दारू आणि इतर व्यसनांच्या तो पूर्णपणे आहारी गेलेला होता. घटनेपूर्वी दोन दिवस तो सतत नशेत तर्र होता. पत्नी व मुलांना त्याने बेदम मारहाण केली होती. पत्नी लक्ष्मीने भीतीपोटी मुलांसह माहेर गाठले होते. २८ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबाराला सुनील घरी आला. वृद्ध आईने त्याला जेवण वाढले; पण जेवणाचे ताट भिरकावून सुनीलने आईकडे दारूला पैसे मागितले. पैसे नाहीत म्हणताच सुनीलने आईचा गळा आवळला. आई मरण पावली. पण सुनीलचा राग शमला नाही. चाकू आणि सत्तूरने त्याने आईच्या पोटावर, मांडीवर वार केले. शरीराच्या उजव्या बाजूचे अवयव काढले. ते स्टोव्हवर शिजवून तोंडात टाकले... चावले... चघळले...
जिल्हा न्यायालयात या खटल्यात्त ३४ साक्षीदारांपैकी प्रत्यक्षात १२ जणांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. तपास अधिकारी संजय मोरे, गुरुप्रसाद जाधव, मयुर कंदले, नवनाथ डवरी, फिर्यादी राजू कुचकोरवी, डॉ. नितीन जगताप, रफिक बागवान, तानाजी चौगुले, नथुराम गायकवाड सहायक निरीक्षक तृप्ती देशमुख, उपनिरीक्षक भाऊसाहेब मलगुडे, रक्षका कुचकोरवी यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या होत्या.
नरभक्षक प्रवृत्ती ठेचण्याजोगीच; दुर्मिळातील दुर्मीळ प्रकरण
लेकरांसाठी आईचे काळीज तुटते म्हणतात... दोषीने तेही शिजवले !
कोल्हापूरमध्ये २८ ऑक्टोबर २०१७ रोजी ही घटना घडली होती. आईने दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही, या रागातून सुनीलने तिची गळा आवळून हत्या केली. हत्या करून त्याचे क्रौर्य शमले असले तरी विकृती मात्र शमली नाही. सुनीलने आईचे काळीज व इतर अवयवांना चटणी, मीठ लावून ते स्टोव्हवर भाजले. रक्तबंबाळ अवस्थेतील आईच्या मृतदेहाशेजारी सुनील बसलेला असल्याचे शेजारच्या मुलाने पाहिले होते. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. या घटनेने कोल्हापूरसह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती.