

कोल्हापूर : ‘हर घर जल’चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुरू असलेल्या जलजीवन मिशन योजनेला कोल्हापूर जिल्ह्यात निधीअभावी ‘ब्रेक’ लागण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यातील सुमारे 1,200 कामांचे तब्बल 200 कोटी रुपयांचे अनुदान थकल्याने ठेकेदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. ही थकीत बिले त्वरित न मिळाल्यास येत्या 15 जुलैपासून जिल्ह्यातील सर्व कामे बंद करण्याचा निर्वाणीचा इशारा कोल्हापूर जिल्हा परिषद कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने दिला आहे.
याबाबत जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना असोसिएशनच्या वतीने निवेदन देण्यात आले. एप्रिल 2024 पासून जलजीवन मिशनसाठी शासनाकडून निधीच उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे कर्जाचे हप्ते, खरेदी केलेल्या साहित्याचे पैसे, कामगारांचे पगार आणि मशिनरीचे भाडे कसे द्यायचे, या विवंचनेत ठेकेदार सापडले आहेत. या आर्थिक आणि मानसिक त्रासामुळे काम करणे अशक्य झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.
अनेक ठिकाणी कामे भौतिकद़ृष्ट्या पूर्ण झाली असली, तरी केवळ इतर शासकीय विभागांच्या परवानग्या, वीज जोडणी किंवा ग्रामपंचायतीकडून काम पूर्णत्वाचा दाखला मिळत नसल्याने बिले अडकून पडली आहेत. हा एकप्रकारे अन्यायच आहे. त्यामुळे अंतिम बिलातून लोकवर्गणीची 5 टक्के रक्कम कापू नये आणि सुरक्षा ठेव परत मिळावी, अशी मागणीही असोसिएशनने केली आहे. शिष्टमंडळात प्रदीप पाटील, दिलीप पाटील, शैलेश नामजोशी, किशोर जामदार, बाळासाहेब तुरंबे, जयसिंग पाटील आदींचा समावेश होता.