कोल्हापूर : सलग तिसर्‍या दिवशी पावसाने झोडपले

पंचगंगा 13.4 फुटांवर; आज यलो अलर्ट
It has been raining for three days
कोल्हापूर : मंगळवार पेठ येथील मंडलिक वसाहत येथे मुख्य रस्त्यावर पावसामुळे असे पाणी साचले होते.Pudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : गेल्या तीन दिवसांपासून परतीचा पाऊस शहरासह जिल्ह्याला झोडपून काढत आहे. मंगळवारी दुपारी शहरात काही ठिकाणी जोरदार, तर काही ठिकाणी मध्यम सरी कोसळल्या. मुसळधार पावसामुळे शहरातील सखल भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. दरम्यान, जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने मंगळवारी रात्री 9 वाजता पाणी पातळी 13 फूट 4 इंचांवर होती. गेल्या 24 तासांत कोल्हापुरात 11 मि.मी. पाऊस झाला असून, बुधवारी (दि. 25) देखील ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

शहरासह जिल्ह्याला परतीच्या पावसाचा तडाखा बसला आहे. मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. सुमारे दीड तास कोसळलेल्या कोसळधारांमुळे सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. यानंतर काही काळासाठी पावसाने उघडीप घेतली. पुन्हा साडेपाचच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली होती. रात्री उशिरापर्यंत शहरात पावसाची रिपरिप सुरू होती. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 7.1 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक 18.4 मि.मी. पाऊस गगनबावडा तालुक्यात झाला आहे. त्यानंतर भुदरगड तालुक्यात गारगोटी, कूर, करडवाडी, तर करवीर तालुक्यात कसबा बावडा, बीड, बालिंगे, हळदी येथे जोरदार पाऊस झाला. धरण क्षेत्रातही पावसाचा जोर वाढला असून, तुळशी, दूधगंगा, पाटगाव, घटप्रभा, जांबरे या धरण क्षेत्रात पाऊस झाला आहे.

शहरात तीन दिवसांत 40 मि.मी. पाऊस

शहराला परतीच्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. शहरात गेल्या तीन दिवसांपासून दुपारी दीड ते दोन तासांत 11 ते 15 मि.मी. पाऊस होत आहे. जिल्ह्याच्या सरासरीच्या तुलनेत शहरात अधिक पाऊस कोसळत आहे. गेल्या तीन दिवसांत सुमारे 40 मि.मी. पाऊस झाला आहे. यामध्ये रविवारी 15 मि.मी., सोमवारी 12 मि.मी., मंगळवारी 11 मि.मी. पाऊस झाला.

परीख पुलाखाली मोटारसायकल अडकली

पावसामुळे परीख पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते. यामुळे येथून ये-जा करताना दुचाकीस्वारांना चांगलीच कसरत करावी लागत होती. पुलाखालील साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने एक मोटारसायकलस्वार थेट पुलाच्या बाजूला असलेल्या गटारीत जाऊन अडकला. उपस्थितांनी त्याची मोटारसायकल बाहेर काढली.

जयंती नाला ओव्हर फ्लो

गेल्या तीन दिवसांपासून जयंती नाला ओव्हर फ्लो झाला असून, लाखो लिटर सांडपाणी थेट पंचगंगेत मिसळत आहे. दिवसभर शहरासह उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे. यामुळे छोट्या-मोठ्या नाल्यांमधून सांडपाणी जयंती नाल्यात येत असल्याने नाला ओव्हर फ्लो झाला आहे.

शहरात वाहतूक कोंडी

पावसामुळे शहरातील प्रमुख चौकांसह रस्त्यांवर ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होत होती. स्टेशन रोड, शाहूपुरी, परीख पूल या परिसरामध्ये वाहतूक कोंडी झाली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news