धामोड : पुढारी वृत्तसेवा : धामोड (ता. राधानगरी) परिसरातील पश्चीम भागाला जोडणाऱ्या महत्वाच्या मार्गावर दररोज अपघात घडत आहेत . रस्त्यावर साचलेले पाणी व त्याला लागुनच असलेल्या वळणामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले असुन एखाद्या मोठा अपघात झाल्यानंतर बांधकाम विभागाला जाग येणार का ? असा संतप्त सवाल या परिसरातील वाहन धारक व नागरिकांतून केला जात आहे.
मागील दोन महीने सुरू असलेल्या पावसाने धामोड ते शिरगाव मार्गावर सुधाकर चौगले यांच्या बंगल्यासमोर रस्त्यावर सखल भागात पाणि साचले आहे. येथे मोठे वळण व तीव्र उतार असून सर्वच वाहनधारक पाण्यातून वाहने घालण्यापेक्षा उजव्या बाजूने वाहने चालवताना दिसत आहेत. त्याला लागूनच मोठे वळण असल्याने समोरून आलेले वाहन दिसत नाही . व समोरा समोर धडक होते. अनेकांना गंभीर दुखापती झाल्या व वाहनांचे नुकसान झाले. पण पोलिसांचा ससेमीरा टाळण्यासाठी कुणीही तक्रार केलेली नाही. अपघातात आजपर्यंत जीवित हानी झालेली नसल्याने स्थानिक प्रशासन व बांधकाम विभागाला अद्याप जाग आलेली नाही.
येथे होणाऱ्या अपघातांची नोंद सुधाकर चौगले यांनी बंगल्यावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरेमध्ये होत आहेत. त्यामुळे दररोज होणाऱ्या अपघातांचे फुटेज पाहुन रस्त्यावर साचणाऱ्या पाण्यावर बांधकाम विभागाने तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी धामोड परिसरातील वाहनधारक व नागरिकांतून होत आहे.