

म्हालसवडे : म्हालसवडे (ता. करवीर) येथील रंगराव रामचंद्र कांबळे (53) व मनीषा रंगराव कांबळे (45) या पती-पत्नीचा ‘टाका’ नावाच्या शेतातील विहिरीत बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 18) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. घटनेची नोंद करवीर पोलिसात झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनीषा व रंगराव हे दुपारच्या सुमारास शेतात गेले होते. सायंकाळी शेतातील गोठ्यामधील जनावरांसाठी पाणी आणण्याकरिता मनीषा गेल्या होत्या. त्या पाय घसरून विहिरीत पडल्या. त्यांना वाचवण्यासाठी गेलेले पतीही विहिरीत बुडाले. परिसरातील शेतकर्यांच्या ही घटना काही वेळानंतर लक्षात आली. त्यानंतर विहिरीवर तरंगणारे पाण्याचे भांडे व चप्पल यामुळे ते विहिरीत पडले असल्याचा अंदाज काहींना आला. अडचणीत असलेल्या विहिरीतून दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी युवकांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. सायंकाळी उशिरा दोघांचेही मृतदेह कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सून व नात असा परिवार आहे. हे दोघे मनमिळावू असल्यामुळे गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.