कोल्हापूर : आत्मनिर्भर भारत अंतर्गत देशात संरक्षण क्षेत्राची उत्पादने तयार करण्याचा निर्धार सरकारने केला आहे. अनेक सरकारी कंपन्यांना शेअर मार्केटमध्ये यामुळे ‘अच्छे दिन’ आले असून, संरक्षण क्षेत्रातील शेअरमध्ये गुंतवणुकीची मोठी संधी आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी मंगळवारी येथे केले.
यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पावर जागतिक राजकारणाचा प्रभाव
सोने, घर, शेअर बाजारातील उत्पन्न कररचनेत हाच अर्थसंकल्पाचा खरा अर्थ
देशाच्या तीन दशकांतील सातत्यपूर्ण आर्थिक धोरणामुळेच जीडीपीचे लक्ष्य साध्य करता आले
विकसित भारताचा रोडमॅप म्हणून अर्थसंकल्पाकडे पाहा
रोटरी मुव्हमेंट कोल्हापूर, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स, दि चार्टर्ड अकौंटंटस् सोसायटी यांनी आयोजित केलेल्या ‘केंद्रीय अर्थसंकल्प 2024’ चर्चासत्रात ते बोलत होते. दैनिक ‘पुढारी’ माध्यम प्रायोजक होते. एसपी वेल्थ कोल्हापूर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते. या कार्यक्रमाला दै. ‘पुढारी’चे कार्यकारी संपादक विजय जाधव, एस.पी. वेल्थचे प्रवर्तक अनिल पाटील प्रमुख उपस्थित होते. सामान्य लोक अर्थसंकल्पात काय स्वस्त, काय महाग, एवढेच पाहतात; पण गुंतवणूकदारांनी नेमक्या अर्थकारणाचा अभ्यास करून अर्थसंकल्पाकडे पाहिले पाहिजे, असे सांगून चंद्रशेखर टिळक म्हणाले, यंदाच्या अर्थसंकल्पावर जागतिक राजकारणाचा विशेष प्रभाव दिसून आला. आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर तीन महिन्यांनी उशिरा अर्थसंकल्प सादर झाला असला तरी या तीन महिन्यांत अमेरिका तसेच आशिया खंडातील बदलत्या राजकीय घडामोडींचे अप्रत्यक्ष पडसाद त्यावर उमटले आहेत.
कोणतेही सरकार खर्च व उत्पन्न यांची सांगड घालूनच अर्थसंकल्प सादर करते. कोरोना काळानंतर गुंतवणूकदारांची मानसिकता बदलत गेली आहे. पेट्रोल, डिझेल व कोळसा यापुरताच अर्थसंकल्प मर्यादित न राहता घर, सोने व शेअर बाजार यावर तो विस्तारलेला आहे. 2020 सालच्या अर्थसंकल्पात आत्मनिर्भर भारत अंतर्गत 75 टक्के संरक्षण क्षेत्रासाठी लागणारी उत्पादने भारतात बनवण्याचा निर्णय झाला होता, तो लक्षात घ्यावा लागेल. याचा लाभ आता गुंतणूकदारांना होणार आहे. अर्थतज्ज्ञ विजय ककडे यांनी तरुणांच्या हाताला रोजगार देणारा व विकसित भारताचा रोडमॅप म्हणून या अर्थसंकल्पाकडे पाहावे लागेल. रोटरी मुव्हमेंटची अर्थसाक्षरतेची चळवळ ही गुतंवणूकदारांसाठी उपयुक्त असल्याचे चर्चासत्राची पार्श्वभूमी मांडताना सांगितले.
चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी, गेल्या अर्थसंकल्पातील जमा-खर्चाचा तपशील नव्याने मांडण्यात येणार्या अर्थसंकल्पात दिला गेला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. सीए सुनील नागावकर यांनी प्रास्ताविकात बजेटमधील तरतुदींवर चर्चा होऊन नेमके कोणाच्या पदरात काय पडले, याचे विवेचन होण्यासाठी या चर्चासत्राचे आयोजन केल्याचे सांगितले. कोल्हापूरच्या अर्थ, व्यापार, गुंतवणूक क्षेत्राला याचा नक्कीच लाभ होईल, असेही ते म्हणाले. रोटरी मुव्हेमेंटचे सचिव किरण पाटील यांनी आभार मानले. या चर्चासत्राला शेअर मार्केट क्षेत्रातील गुंतवणूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आजचा तरुण हा शेअर गुंतवणूक करताना दीर्घकालीन लाभ न पाहता तत्काळ लाभ ज्या गुंतवणूकीतून मिळेल, त्याला प्राधान्य देत आहेत. पूर्वी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना दीर्घकालीन फायदा किती मिळणार, याचा अभ्यास केला जात होता. यानंतरच गुंतवणूक केली जात होती. आज देशातील तरुणाला तत्काळ लाभाची अपेक्षा असते. यातून तो गुंतवणूक करतो. यातून देशाच्या जीडीपीमध्ये वाढ होत असल्याचे स्पष्ट होते. 2001 साली देशाचा जीडीपी दर हा 1.4 टक्का होता, तो आज 6.7 टक्क्यांवर आला आहे. यावरून देशाची आर्थिक धोरणे सातत्यपूर्ण आणि योग्य दिशेने चालली असून, अर्थसंकल्पाच्या तिजोरीची चावी तरुणांच्या हाती असल्याचे टिळक यांनी स्पष्ट केले.