

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा घरकुलाचे प्रलंबित असलेले हप्ते मिळवून देण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच घेताना हेर्ले ग्रामपंचायतीचा दिवाबत्ती कर्मचारी राहुल सहदेव निंबाळकर (36, रा. हेर्ले, ता. हातकणंगले) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. त्याचा साथीदार रोजगार सेवक सुरज जिनगोंडा पाटील (रा. हेर्ले) हा पसार झाला.
शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली. तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मंजूर झाले आहे. याचे प्रलंबित हप्ते वरिष्ठ कार्यालयातून मंजूर करून देतो, याकरिता तेथील अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतील, असे सांगून 25 हजार रुपयांची मागणी ग्रा.पं. कर्मचारी निंबाळकर याने केली होती. तडजोडीअंती 20 हजार रुपये इतकी रक्कम ठरली होती. तक्रारदाराने याबाबत निंबाळकर व त्याचा साथीदार पाटील याच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार लाचेची रक्कम स्वीकारताना निंबाळकर याला रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईदरम्यान त्याचा साथीदार पाटील पसार झाला. निंबाळकरसह पाटील याच्या विरोधात हातकणंगले पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई लाचलुचपतच्या अधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, पो.हे.कॉ. सुधीर पाटील, पो.कॉ. संदीप पवार, पो.कॉ. कृष्णा पाटील, पो.कॉ. प्रशांत दावणे यांनी केली.