कोल्हापूर : दोन दिवसांपासून काहीशी उसंत घेतलेल्या पावसाने रविवारी शहरासह जिल्ह्यात पुन्हा जोर धरला. हवामान विभागाने जिल्ह्याला रविवारी ऑरेंज अलर्ट दिला होता. गेल्या 24 तासांत राधानगरीसह नऊ धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाली. मात्र पंचगंगेच्या पाणी पातळीत घट होत असून रविवारी पातळी सुमारे एका फुटाने कमी झाली. यामुळे चार दिवसांपासून जामदार क्लबजवळ असणारे पुराचे पाणी कमी होत आहे. रात्री 9 वाजता पंचगंगेची पातळी 41.1 फुटांवर होती.
शहरात दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. याशिवाय अधूनमधून मोठ्या सरी कोसळत होत्या. यामुळे शहरात सखल भागात व खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साठले होते. ही डबकी चुकवताना दुचाकीस्वारांना कसरत करावी लागत होती. जिल्ह्यातही पावसाचा जोर पाहायला मिळाला. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 14.3 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक 27 मि.मी. पाऊस चंदगड तालुक्यात झाला. त्यानंतर शाहूवाडी 24.4, पन्हाळा, 24, गगनबावडा 22.6, आजरा 22.5, करवीर 11.1, राधानगरी 10.8, गडहिंग्लज 9.9, कागल 8.4, हातकणंगले 4.1 तर, शिरोळ येथे 2 मि.मी. पाऊस झाला.
गेल्या 24 तासांत पंचगंगेची पाणी पातळी 11 इंचाने कमी झाली. शनिवारी रात्री 9 वाजता पाणी पातळी 42 फुटांवर होती. त्यानंतर रविवारी सकाळी सात वाजता पातळी 41.8 फुटांवर आली. दुपारी चार वाजेपर्यंत पाणी पातळीत 5 इंचाची घट होऊन पातळी 41.3 फुटांवर आली. रात्री 9 वाजता पातळी 41.1 फुटांवर होती. जिल्ह्यातील 68 बंधारे अद्याप पाण्याखाली असल्याने 10 राज्य मार्ग व 45 जिल्हा मार्ग अद्याप पाण्याखाली आहेत. तसेच 20 मार्गावरील एसटी सेवा अद्याप बंद आहे.
धरण क्षेत्रातही पावसाचा जोर वाढला आहे. राधानगरी 103 मि. मी., तुळशी 83, दूधगंगा 78, पाटगाव 85, चित्री 95, घटप्रभा 125, जांबरे 83, सर्फनाला 120, कोदे 69 या नऊ धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. राधानगरी धरणाचे 6 नंबर व 7 नंबरचे दरवाजे खुले असून धरणातून 4356 क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे.
पावसामुळे जिल्ह्यात घरांची पडझड सुरूच आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यातील 10 पक्क्या व 59 कच्च्या घरांची अंशतः पडझड झाली आहे. 3 जनावरांच्या गोठ्यांचीही पडझड झाली आहे. तर 4 मोठ्या दुधाळ जनावरांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 22 लाख 23 हजार रुपयांच्या 75 खासगी मालमत्तांचेही नुकसान झाले आहे.