कोल्हापूर : शेतकर्यांच्या मुलांसाठी देण्यात येणार्या शैक्षणिक कर्जाच्या व्याजात चार टक्के कपात करण्याची घोषणा कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी बँकेच्या 87 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली. त्यामुळे 30 लाखांपर्यंतचे शैक्षणिक कर्ज आता विकास सेवा संस्थांना 8 टक्क्यांनी मिळणार आहे. पूर्वी हे व्याज 11 टक्के होते. कसबा बावडा येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात सभा पार पडली.
अध्यक्षीय भाषणात मुश्रीफ यांनी, सभासद, शेतकरी आणि सहकारी संस्थांच्या पाठबळावर जिल्हा बँकेने दहा वर्षांत प्रचंड प्रगती साधली असून आगामी काळात देखील बँकेची वाटचाल अधिक दमदार होईल, असा विश्वास व्यक्त केला.
आगामी वर्षातील उद्दिष्टांबाबत बोलताना त्यांनी 13 हजार कोटींच्या ठेवी, 10 हजार कोटी कर्जवाटप, 5 हजार कोटी गुंतवणूक तसेच ढोबळ नफा 325 कोटी, सीआरएआर 15 टक्के आणि नेट एनपीए शून्यावर आणण्यात येणार असल्याचे सांगितले. ऊस उत्पादन वाढविण्याची अत्यंत गरज असून त्यासाठी एआयचा वापर शेतकर्यांनी केला पाहिजे, अन्यथा भविष्यात साखर उद्योग उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले. उपाध्यक्ष राजूबाबा आवळे यांनी आभार मानले. यावेळी संचालक आ. सतेज पाटील, आ. अमल महाडिक, आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, निवेदिता माने, संजय मंडलिक, राजेश पाटील, संजय घाटगे, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, ए. वाय. पाटील, अर्जुन आबिटकर, श्रृतिका काटकर, स्मिता गवळी, विजयसिंह माने, रणजितसिंह पाटील, भैया माने, दिलीप लोखंडे, संतोष पाटील, सुधीर देसाई आदी उपस्थित होते.
शक्तीपीठला विरोध करणारा ठराव करण्याची मागणी
अतिवृष्टी तालुक्यांतील शेतकर्यांची कर्ज माफ करावी
कृषी पर्यटनाला जिल्हा बँकेने मदत करावी
दूध संस्थांना जिल्हा बँकेने मदत करण्याची मागणी
लवकरच नोकरभरती करण्याचा निर्णय
2015 च्या तुलनेत 2025 मध्ये ठेवी, कर्जवाटप, गुंतवणूक यामध्ये दहापटीने वाढ
संचित तोट्याच्या दलदलीतून बाहेर येत बँकेने आता निव्वळ नफा मिळविला
5 लाखांपर्यंत बिनव्याजी पीककर्ज योजना
जातिवंत म्हैस खरेदीसाठी अनुदान, कृषी ड्रोन खरेदीला प्राधान्य
ऊस उत्पादन वाढीसाठी ए.आय-तंत्रज्ञान वापर योजना
स्व. आमदार पी. एन. पाटील पीक प्रोत्साहन अनुदान योजना
महिलांसाठी स्वयंसहायता बचत गटांना अर्थसहाय्य
ताराराणी महिला सक्षमीकरण योजनेत 30 हजारांपर्यंत वैयक्तीक कर्ज
विशेष प्रवर्गातील महिला व तृतीयपंथीयांना विनातारण कर्ज