जयसिंगपूर : पुढारी वृत्तसेवा
गतवर्षी दहीहंडी उत्सवातील सुमारे ५० हजार गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यामुळे गोविंदा पथकांना विमा संरक्षण मिळाले होते. यात शिरोळ येथील ७ गोविंदा पथकातील २७०० हून अधिक गोविंदांना विम्याचे संरक्षण मिळाले होते. यावर्षी सरकारच्या विमा संरक्षण विना दहीहंड्या होणार आहेत.
दही हंडीचे थर हे उंच उंच असल्याने एखादा थर कोसळल्यास गोविंदा जखमी होतात. यात काही गोविंदांचा मृत्यूही होतो. त्यामुळे यात सहभाग घेण्यासाठी तरुण पुढे येत नाहीत.
शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत मिळत नसल्याने गोविंदांना शासनाकडून विमा कवच देण्याची मागणी होत होती. त्यामुळे गतवर्षी २५ जुलै २०२३ रोजी विमा संरक्षण दिले होते.
यात अपघाती मृत्यू १० लाख, २ अवयव किंवा २ डोळे गमावल्यास १० लाख, एक हात, एक पाय किंवा एक डोळा गमावल्यास ५ लाख त्याचबरोबर पूर्ण अपंगत्त्व आल्यास विमा पॉलिसीतील टक्केवारीनुसार भरपाई, अपघातामुळे रुग्णालयातील खर्च हा प्रत्यक्षात झालेला खर्च किंवा जास्तीत जास्त १ लाख रुपये असा विमा शासनाने दिला होता.
सध्या मात्र गतवर्षीप्रमाणे गोविंदांना विम्याचे संरक्षण अद्याप देण्यात आले नाही. त्यामुळे सरकारने तातडीने गोविदांना विम्याचे संरक्षण देण्याची मागणी होत आहे.
राज्यशासनाने गतवर्षी गोविंदांना विम्याचे संरक्षण दिले होते. त्यामुळे दहीहंडी पथकांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, यावर्षी विम्याचे संरक्षण दिले नाही. त्यामुळे ते तातडीने द्यावे. दहीहंडीला राज्यस्तरीय किंवा राष्ट्रीय दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करावा. तरच हा गोपाळकाला दहीहंडी खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचेल.
महेश पाटील, संयोजक, जय महाराष्ट्र गोविंदा पथक, शिरोळ