

कोल्हापूर : गोकुळची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद असून, गोकुळ कर्मचारी संघटनेने पूरग्रस्त भागातील नागरिक, विद्यार्थी तसेच जनावरांसाठी दाखवलेली संवेदनशीलता अनुकरणीय आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली गोकुळ केवळ आर्थिकद़ृष्ट्या नव्हे, तर सामाजिकद़ृष्ट्याही आघाडीवर आहे, असे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काढले.
गोकुळ कर्मचार्यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्तासाठी एक दिवसाचा पगार जाहीर केला होता. यातून जमलेल्या 13 लाख 25 हजार रकमेचा धनादेश वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत गोकुळ कर्मचारी संघटनेचे सदाशिव निकम, लक्ष्मण पाटील, कृष्णात चौगुले यांनी मुख्यमंत्री सहायता निधीस मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
धनादेशासह सोलापूर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यांतील सुमारे 1 हजार कुटुंबांना 13 लाखांच्या जीवनावश्यक वस्तू, 3 लाखांचे पशुखाद्य व 3 हजार 200 लिटर दूध देण्यात आले. साहित्यामध्ये शैक्षणिक साहित्याचा ही समावेश आहे. या सर्व उपक्रमांद्वारे गोकुळकडून एकूण सुमारे 31 लाख रुपयांची मदत पूरग्रस्त भागांसाठी देण्यात आली आहे.