

कोल्हापूर : ‘गोकुळ’ने दूध संस्थांसाठी जाहीर केलेल्या फरक रकमेतून 40 टक्के रक्कम डिबेंचर म्हणून ‘गोकुळ’ने कपात करून घेतल्याचे संतप्त पडसाद सोमवारी उमटले. ‘परत करा, परत करा, डिबेंचर परत करा’ अशा घोषणा देत संस्था प्रतिनिधी गोकुळ शिरगाव येथील प्रकल्पस्थळी थेट घुसले आणि त्यांनी कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांना घेराव घातला. गोकुळ संचालिका शौमिका महाडिक यांच्यासह या संस्था प्रतिनिधींनी गोडबोले यांना धारेवर धरले.
‘गोकुळ’ने कपात केलेल्या रकमेमुळे संस्था अडचणीत येणार आहेत. त्यामुळे जवळपास 200 संस्था प्रतिनिधींनी शौमिका महाडिक यांची भेट घेऊन ही अन्यायी कपात रद्द करण्यासाठी ‘गोकुळ’च्या कार्यकारी संचालक आणि अध्यक्षांबरोबर चर्चा करण्याची विनंती केली. या कपातीबद्दल ऐकून त्यांनाही धक्का बसला. 500 कोटींच्या ठेवी आहेत, तर संस्थांच्या पोटावर पाय कशाला आणता, असा सवाल करत ही कपात योग्य नसल्याचे सांगितले. संस्था प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर ‘गोकुळ’ प्रकल्पस्थळी जाण्याचा निर्णय घेण्यात आला.
संस्था प्रतिनिधी दुपारी एकच्या सुमारास गोकुळ शिरगाव येथे आले. त्यांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. काही वेळात महाडिक येथे आल्या. ‘परत करा, परत करा, डिबेंचर्स परत करा’ अशा घोषणा देत सर्वजण कार्यालयात घुसले. अध्यक्ष नविद मुश्रीफ नसल्यामुळे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांच्या दालनात गेले. आक्रमक झालेल्या सभासदांनी कार्यकारी संचालकांना धारेवर धरले. एका हाताने तुम्ही 136 कोटींचे फरक बिल देता, त्याचा गाजावाजा करता आणि दुसर्या हाताने त्यातील तब्बल 40 टक्के रक्कम कपात करता, हा कुठला कारभार? असा सवाल केला. संस्थांना विश्वासात न घेता डिबेंचर कपात केलीच कशी? अशी विचारणा करत 10 तारखेपर्यंत फरकाची रक्कम न मिळाल्यास गायी, म्हशींसह ‘गोकुळ’च्या दारात आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला.
यासंदर्भात आपण एकटा निर्णय घेऊ शकत नाही. अध्यक्ष मुंबईला गेले आहेत. ते आल्यानंतर पाहू, असे ‘गोकुळ’चे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांनी सांगितले. आंदोलनात बाळासाहेब नाईक, चंद्रशेखर गुरव, सांगाप्पा भुसुरी, संदीप चव्हाण, कृष्ण चव्हाण, जोतिराम घोडके, अमर पाटील, माजी संचालक विश्वास जाधव, धैर्यशील देसाई, हंबीरराव पाटील, राजवर्धन नाईक-निंबाळकर, प्रताप पाटील (कावणेकर) आदी सहभागी झाले होते.
‘गोकुळ’ची आर्थिक परिस्थिती चांगली असताना संस्थांना कोणतीही पूर्वकल्पना न देता कापून घेण्यात आलेली डिबेंचरची रक्कम तत्काळ परत केली पाहिजे. शुक्रवार (दि. 10) पर्यंत निर्णय न झाल्यास होणार्या आंदोलनात आपण सभासदांसोबत असल्याचे संचालिका शौमिका महाडिक यांनी सांगितले.
महाडिक म्हणाल्या...
संचालकांची बैठक तत्काळ बोलवावी.
एकाही बैठकीचे इतिवृत्त दिले जात नाही.
बोगस संस्था इतक्या केल्या आहेत की, त्यांना मतांची गरज नाही.
निवेदन दिले असताना प्रशासन किंवा अध्यक्षांनी गांभीर्याने का घेतले नाही?