

कोल्हापूर : गोव्यातून बनावट दारूची तस्करी करणार्या सांगली जिल्ह्यातील दोन संशयितांना स्थानिक गुन्हे अन्वेषणने सोमवारी जेरंबद केले. त्यांच्याकडून 51 हजार 840 रुपये किमतीचा दारूसाठा व आलिशान मोटार असा 7 लाख 51 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. राधानगरी रोडवर नवीन वाशीनाक्याजवळ सापळा रचून कारवाई करण्यात आली.
शुभम शिवकुमार साळुंखे (वय 28), आशितोष हिंदुराव साळुंखे (27, रा. जाधवनगर, आंधळी पलूस, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. संशयितांविरुद्ध करवीर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित शुभम व आशितोष आलिशान मोटारीतून गोव्यातील बनावट दारूची तस्करी करीत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह पथकाला मिळाली.
उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकाने नवीन वाशी नाक्याजवळील हॉटेलसमोर सापळा लावला. भरधाव येणार्या मोटारीला रोखून तपासणी केली असता, त्यामध्ये दारूसाठा आढळून आला. गोव्यातील दारूसाठा कोणाकडून व कोणासाठी आणण्यात येत होता, याची सखोल चौकशी सुरू असल्याचे कळमकर यांनी सांगितले.