

कोल्हापूर : शेंडा पार्क, आर.के.नगर परिसरात गांजा तस्करी करणार्या पाचगाव (ता. करवीर) येथील तरुणाला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. मयूर मोतीलाल मिणेकर (वय 24, रा. रेणुकानगर) असे त्याचे नाव आहे. संशयिताकडून 30 हजार रूपये किमतीचा सव्वा किलो गांजा हस्तगत करण्यात आला. रविवारी (दि.26) रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.
शेंडा पार्क ते आर.के.नगर रोडवर संशयित गांजा तस्करी करीत असल्याची माहिती राजारामपुरी पोलिसांना मिळाली. सहायक पोलिस निरीक्षक भारत साळुंखे यांच्या पथकाने रविवारी रात्री परिसरात शोधमोहीम राबविली. संशयित रिक्षाच्या आडोश्याला थांबून गांजा तस्करी करीत असल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. झडतीत सॅकमध्ये सव्वा किलो गांजा आढळून आला. न्यायालयाने त्यास पोलिस कोठडी दिली. गांजा कोठून आणि कोणासाठी आणला, याची संशयिताकडे चौकशी सुरू आहे, असे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सांगितले.