

कोल्हापूर ः शहरातील सर्वात वाहतुकीने गजबजलेल्या आणि चारही बाजूने शहराला जोडणाऱ्या गंगावेस आणि रंकाळवेस चौक हे कायमच अपघातासाठी हॉटस्पॉटर राहिले आहे. या ठिकाणाहून चालताना अक्षरशः जीव मुठीत घेऊन जावे लागते. कोणत्या दिशेने वाहन येईल हे सांगता येत नाही इतकी भयानक परिस्थिती आहे. ना येथे वाहतूक पोलिस, ना वाहतुकेीचे नियंत्रण! याच चौकातील खड्ड्यातून नेत्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या मोटारी जनतेच्या अंगावर धुरळा उडवत जातात; मात्र येथील वाहतुकीला शिस्त लावावी, असे या मंडळींना कधी वाटले नाही.
गंगावेशीत पापाची तिकटी, रंकाळा वेस, कसबा गेट, पंचगंगा रोड आदी ठिकाणाहून वाहने येतात. गंगावेशेत वाहतूक नियंत्रणासाठी सिग्नल बसविण्यात आला; मात्र तो मुहूर्तापुरताच सुरू ठेवला गेला. त्यामुळे वाहतुकीचे नियंत्रण होत नाही. वाहतूक नियंत्रणासाठी येथे कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची गरज आहे; मात्र अशी कोणतीही व्यवस्था नाही. गंगावेस येथून पंचगंगा नदीकडे जाणाऱ्या दोन्ही म्हणजे दूध कट्टा शेजारी व दत्त मंदिर शेजारी वारंवार वाहतूक कोंडी होते. किरकोळ स्वरूपाचे अपघात वारंवार होतात. मात्र, त्याच्याकडे लक्ष द्यावे असे नेत्यांना आजपर्यंत कधी वाटले नाही. गंगावेस आणि रंकाळावेसचा चौक हा केवळ आपली पोस्टर्स लावण्यासाठी आहे अशीच नेत्यांची समजूत आहे.
रंकाळावेस चौकातही भयानक अवस्था आहे. गंगावेस, खरी कॉर्नर, रंकाळा तलाव, दुधाळी आणि धोत्री गल्लीतून येणारे रस्ते या चौकात मिळतात. गंगावेस आणि रंकाळावेस या दोन्ही चौकातून अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. आता उसाचा हंगाम सुरू होईल. तेव्हा अपघाताचे प्रमाण वाढते हे नेहमीचे आहे. मात्र, येथेही प्रत्येकाला आपल्या जबाबदारीवरच जावे लागते. या चौकातून पादचाऱ्यांनी कसे जायचे, वृद्ध आणि शाळकरी मुलांनी रस्ता कसा ओलांडायचा याची काळजी करावी असे पोलिस अधिकाऱ्यांनाही कधी वाटले नाही आणि लोकप्रतिनिधींना तर त्याची फिकीर नाही. अशा परिस्थितीत अपघात नेहमीचेच.
एसटी बसेस, ट्रक, ट्रेलर, वडापची वाहने, दुचाकी व चारचाकी वाहने यांच्या कोंडीतून एखाद्या पादचाऱ्याला रस्ता ओलांडायचा असेल तर जीव मुठीत घेऊनच पुढे जावे लागते. अत्यंत वेगाने रंकाळावेस चौकात वाहने वळण घेतात. त्यांच्या नियंत्रणासाठी ना पोलिस, ना कोणतीही यंत्रणा! रस्त्याची अवस्था तर बेकारच. अशा परिस्थितीत जनतेला वाटचाल करावी लागत आहे. गेली अनेक वर्षे या परिस्थितीत फरक पडत नाही. एखादा अपघात झाला की एक दोन दिवसापुरता पोलिस उभा करण्याचा देखावा केला जातो. पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ अशी स्थिती असते.