

कोल्हापूर : तरुणीवर खुनीहल्ला करून भररस्त्यात चाकू, कोयते नाचवून दहशत माजवणार्या पाच तरुणांना पोलिसांनी बुधवारी अटक केली. मंगळवारी सायंकाळी 5 च्या सुमारास रजपूतवाडी ते वडणगे फाटा या रस्त्यावर चिखली फाट्याजवळ ही घटना घडली होती. पोलिसांनी त्यांना खाक्या दाखवत घटनास्थळी तपासासाठी फिरवले. यावेळी बघ्यांची चांगलीच गर्दी झाली होती.
उत्कर्ष सचिन जाधव (वय 25, रा. कदमवाडी रोड, कोल्हापूर), अभिषेक ऊर्फ अभ्या विनय पिसाळ (23, रा. राजारामपुरी), हर्षवर्धन शरद सुतार (23, रा. रजपूतवाडी, ता. करवीर), अनुराग ऊर्फ टेढ्या जयसिंग निमन (23, रा. उजळाईवाडी, ता. करवीर), प्रथमेश भीमराव कांबळे (21, रा. उत्रे, ता. पन्हाळा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. कस्तुरी आदित्य गवळी (22, रा. फुलेवाडी रिंगरोड, कोल्हापूर) यांनी त्यांच्याविरुद्ध करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक किशोर शिंदे तपास करत आहेत.
कस्तुरी गवळी व उत्कर्ष जाधव, पिसाळ हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. गवळी या मंगळवारी सायंकाळी 5 च्या सुमारास रजपूतवाडी येथे मित्र संग्राम चौगुले यांच्याबरोबर जेवणासाठी गेल्या होत्या. त्यावेळी जाधव, पिसाळ यांनी कस्तुरीने मला शिव्या दिल्यात, मी तिला मारून टाकणार, तू मध्ये येऊ नकोस, असे दरडावत चौगुले याला ढकलून दिले आणि कमरेला लावलेला लहान कोयता काढून कस्तुरी गवळी यांच्या मानेवर, पायावर वार केले. याचवेळी पिसाळ याने चाकूने डोक्यात वार केले. गवळी यांना वाचवताना चौगुले यांच्याही छाती, हात आणि पायावर चाकू लागला. पोलिसांनी जाधव व पिसाळ यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, इतर तिघांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.