

कोल्हापूर : एक कोटीच्या बनावट नोटा प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर चौकशी सुरू आहे. मिरज पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह विशेष पथकाने मास्टरमाईंड आणि कोल्हापूर पोलीस दलातील मोटार वाहन विभागातील चालक तथा हवालदार इब—ारसय्यद इनामदार (रा. कसबा बावडा) याच्यासह जेरबंद साथीदारांकडे रविवारी दहा तास चौकशी केली. यात कोल्हापूर येथील आणखी काही संशयितांची नावे निष्पन्न होण्याची शक्यता आहे.
विशेष तपास पथकाने मास्टरमाईंड इनामदारसह साथीदार सुप्रीत काडाप्पा देसाई (रा. गडहिंग्लज, कोल्हापूर), राहुल राजाराम जाधव (रा. लोकमान्यनगर, कोरोची, ता. हातकणंगले), नरेंद्र जगन्नाथ शिंदे (रा. टाकाळा, राजारामपुरी, कोल्हापूर), सिद्धेश जगदीश म्हात्रे (रा. मालाड, मुंबई) यांच्याकडे स्वतंत्रपणे चौकशी केली. तपासात निष्पन्न झालेल्या तपशिलाबाबत अधिकार्यांनी गोपनियता पाळली आहे.
मास्टरमाईंड इनामदार, जगन्नाथ जाधव, नरेंद्र शिंदे हे कोल्हापूरसह परिसरातील अनेक सराईत गुन्हेगारांच्या संपर्कात होते. स्थानिक गुन्हेगारांच्या मदतीने बनावट नोटा खपविल्या असाव्यात, असा तपास अधिकार्यांचा संशय आहे. त्यामुळे शहर परिसरातील आणखी काही संशयितांची नावे चौकशीत उघडकीला येण्याची शक्यता आहे; मात्र याबाबत तपास पथकातील अधिकार्यांनी गोपनियता पाळली आहे.