

राजेंद्र जोशी
कोल्हापूर : भारतीय औषधांच्या बाजारपेठेत बनावट आणि दर्जाहीन औषधांचा सुळसुळाट काही संपत नाही. गेल्या महिन्यात चेन्नई स्थित औषध कंपनीच्या ‘कोल्ड्रिफ’ या औषधाने देशातील 27 निष्पाप बालकांचे जीव घेतला होता. त्याच्या चौकशीची फाईल तयार होण्यापूर्वीच आणखी एक खोकल्याचे औषध भेसळयुक्त आणि दर्जाहीन असल्याचे छत्तीसगडमधील राज्य प्रयोगशाळेत स्पष्ट झाले आहे. यामुळे या बनावट आणि दर्जाहीन औषधांच्या तावडीतून भारतीयांची सुटका केव्हा होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
केंद्रीय औषधे आणि मानके नियंत्रण संघटनेने (सीडीएससीओ) सप्टेंबर 2025 मधील देशातील औषधांच्या नमुन्यांच्या तपासणीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये खोकल्याच्या औषधासह 112 औषधांवर निकृष्टतेचा शिक्का मारला आहे. या नमुन्यांपैकी 52 नमुने केंद्रीय, तर 60 नमुने राज्य प्रयोगशाळांमध्ये तपासण्यात आले. त्यामध्ये ताप व अंगदुखीसाठीचे पॅरासिटामॉल, पित्तशामक पेन्टोप्रेझॉल, बहुजीवनसत्त्वे (मल्टिव्हिटॅमिन) या औषधांचा समावेश आहे. त्याचबरोबर उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी देण्यात येणारे टेल्मिसार्टन आणि वेदनाशामक डायक्लोफेनेक या औषधांच्या काही बॅचेसमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत.
छत्तीसगडच्या राज्य प्रयोगशाळेमध्ये तपासलेल्या औषधांचे नाव ‘बेस्टो-कॉफ’ असे आहे. कोरड्या खोकल्यावर वापरण्यात येणार्या या औषधाच्या नमुन्यामध्ये भेसळ असल्याचे प्रयोगशाळेत सिद्ध झाले. सर्वांत गंभीर बाब म्हणजे, या औषधाच्या मूळ उत्पादक कंपनीने नमुन्यासाठी तपासण्यात आलेल्या ‘बेस्टो-कॉफ’ या खोकल्याच्या औषधाची बॅच त्यांच्या उत्पादनाशी संबंधित नाही, असा खुलासा मूळ उत्पादक कंपनीने करीत याविषयी तक्रारही नोंदविली आहे. याचा अर्थ ‘बेस्टो-कॉफ’ या औषधाची हुबेहूब नक्कल करून कोणा माफियाने हे औषध बाजारात आणले होते. आता या बनावट उत्पादकाचा शोध जारी असून त्याच्यावर औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनातील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.
मध्यप्रदेशात 24 निष्पाप बालकांचा घेतला जीव
गेल्या महिन्यात मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे ‘कोल्ड्रिफ’ या खोकल्याच्या औषधाने प्रथम 24 निष्पाप बालकांचा जीव घेतला. यामध्ये डायइथिलिन ग्लायकॉल याची मात्रा तब्बल 48.6 टक्के इतकी आढळून आली होती. केंद्रीय औषधे मानके नियंत्रण संघटनेच्या नियमानुसार या मूलद्रव्याची परवानगी असलेली मात्रा केवळ 0.1 टक्के इतकी आहे. आता ‘बेस्टो-कॉफ’ या नव्या बनावट औषधाने पुन्हा एकदा बनावट व दर्जाहीन औषधांच्या कारनाम्यांकडे लक्ष वेधले आहे.