कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा : कृष्णा- पंचगंगा नदीच्या महापुराचे पाणी शिरोळ तालुक्यातील 16 हजार हेक्टर शेतीमध्ये शिरले आहे. महापूर इंचा इंचाने ओसरत आहे. गेल्या दहा दिवसांपासून शेतीत पाणी राहिल्याने पिके कुजून खराब झाली आहेत. कोणतेही निकष न लावता तत्काळ शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. कुरुंदवाड शहराला 10 दिवसांपासून महापुराचा विळखा पडल्याने नागरिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सरसकट सानुग्रह अनुदान द्यावे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कुरुंदवाड शहर पूरग्रस्त नागरिक हक्क समितीतर्फे गाव चावडी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदनद्वारे देण्यात आला. (Kolhapur Flood)
कुरुंदवाड पालिका चौकातून मंगळवारी (दि.६) सकाळी ११ वाजता समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव उगळे, राजू आवळे, तानाजी आलासे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापुरामुळे कुरुंदवाड शहराला विळखा पडला आहे. व्यवसाय, रोजगार गेल्या पंधरा दिवसांपासून बंद आहेत. यामुळे व्यवसाय आणि रोजगार नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे १०० टक्के शहर पूरग्रस्त जाहीर करून सर्व नागरिकांना सानुग्रह अनुदान द्यावे. (Kolhapur Flood) |
महापूर ओसरायला विलंब लागल्याने दीर्घकाळ ऊस, सोयाबीन, मुंग, केळी, भाजीपाला या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बुडीत शेतीचे तत्काळ पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी. पंचनाम्याची एक प्रत नागरिक-शेतकऱ्यांना जाग्यावर देण्यात यावी. आमच्या विविध मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी मोर्चात हक्क समितीचे अध्यक्ष पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख उगळे, बाबासाहेब सावगावे, दयानंद मालवेकर, अजित देसाई, राजेंद्र फल्ले, सुनील चव्हाण आदींनी भाषणे केली. यावेळी मोर्चात जितेंद्र साळुंखे, सुनील माळी, अभय पाटूकले, शाहीर आवळे, सद्दाम तहसीलदार, गणेश गुरव, अरुण म्हतापे, सिकंदर सारवान, सुदर्शन माळी, अमोल मोहिते आदी उपस्थित होते.