

कोल्हापूर : कोरोनाने येलूर (ता. वाळवा, जि. सांगली) येथील शामराव आनंदा पाटील (वय 76) या वृद्धाचा कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या दोनवर गेली.
पाटील यांची बायपास शस्त्रक्रिया झाली होती. त्यांचे हृदय कमकुवत झाले होते. त्यांना किडणी विकाराचाही त्रास होता, यामुळे दि. 27 मे रोजी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, त्यांना कोरोनाचीही लागण झाली होती. उपचारास प्रकृती साथ देत नसल्याने त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या 16 रुग्णांची नोंद झाली. यापैकी सात सक्रिय रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून, सात रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले.